लाईव्ह शूटिंग करताना झाला हल्ला
सविस्तर वृत्त असे की, १९ मे २०२६ रोजी पत्रकार रामदास कहाळे हे राहेरी येथील वाळू घाटावरील घडामोडींचे लाईव्ह शूटिंग करत असताना, बातमी लावल्याचा राग मनात धरून वाळू वाहतूकदार कंत्राटदार आणि त्यांच्या जमावाने मिळून त्यांना बेदम मारहाण केली. हा हल्ला म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
पोलीस ठाणेदारांविषयी पत्रकारांमध्ये तीव्र संताप
या गंभीर घटनेत पीडित पत्रकाराला न्याय मिळवून देण्याऐवजी, किनगाव राजा पोलीस ठाण्यात उलट पत्रकार कहाळे यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार अजित दिवटे यांनी रेतीघाटावर गुंड पाळले असून याचेच समर्थन किनगाव राजाचे ठाणेदार संजय मातोंडकर यांनी केले असल्याचा खळबळजनक आरोप पत्रकार संघटनेने केला आहे. दोषींवर कारवाई न करता पत्रकारावर उलटपक्षी खोटे गुन्हे दाखल करणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असून, यामुळे ठाणेदार मातोंडकर यांच्याविषयी पत्रकार वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांकडे तात्काळ कारवाईची मागणी
लोणार तालुका पत्रकार संघटनेने दिलेल्या या निवेदनाद्वारे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
१. पत्रकार रामदास कहाळे यांना मारहाण करणाऱ्या दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.
२. पत्रकारावर राजकीय दबावापोटी दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
३. हे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यापर्यंत तात्काळ पाठवून योग्य ती चौकशी करण्यात यावी.
"आम्ही या भ्याड घटनेचा आणि लोकशाही विरोधी कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. पत्रकारांना संरक्षण मिळणे गरजेचे आहे." > — डॉ. अनिल मापारी (जिल्हा उपाध्यक्ष, मराठी पत्रकार संघ)
निवेदनावर तालुक्यातील पत्रकारांच्या सह्या
या प्रसंगी लोणार तालुका पत्रकार संघटनेचे मार्गदर्शक डॉ. अनिल मापारी, कार्याध्यक्ष गोपाल तोष्णीवाल, सचिव सचिन गोलेच्छा, रेहमान भाई, उमेश कुटे, राहुल सरदार, श्याम सोनुने, पवन शर्मा, शेख समद, विठ्ठल घायाळ, किशोर मोरे, शेख यासिन, सुनील वर्मा, अनिल वायाळ, अशोक इंगळे, संदीप मापारी यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
.jpeg)
0 Comments