बुलढाणा (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आमदार रोहित पवार यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले असून, त्यांची कडक शब्दांत कानउघडणी केली आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी गायकवाडांच्या वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले की, "तुम्ही मला अशा लोकांचे प्रश्न विचारा ज्यांच्याबद्दल बोलायला आम्हालाही बरं वाटेल. आपण राजमाता जिजाऊंच्या भूमीमध्ये आहोत. जिजाऊंच्या भूमीमध्ये राहून जर एखाद्या लोकप्रतिनिधीला महिलांबद्दल बोलताना तारतम्य नसेल, तर हा या पवित्र भूमीचा अपमान आहे."
'ही त्यांची लायकी'
संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना पवार पुढे म्हणाले, "ही संतांची, महामानवांची आणि थोर विचारवंतांची भूमी आहे. येथे महिलांबद्दल अपशब्द वापरणे किंवा महाराजांचा अपमान करणे ही ज्यांची लायकी आहे, त्यांच्यावर बोलून मला माझा, तुमचा आणि ऐकणाऱ्या प्रेक्षकांचा वेळ वाया घालवायचा नाही."
वादाची पार्श्वभूमी
आमदार संजय गायकवाड यांनी रोहित पवारांवर "युवागिरी" करत फिरण्याचा आणि अजित पवारांची जागा घेऊ पाहण्याचा आरोप केला होता. या आरोपांवर थेट उत्तर न देता, रोहित पवारांनी गायकवाडांच्या कार्यशैलीवर आणि भाषेवर बोट ठेवून त्यांना अप्रत्यक्षपणे फटकारले आहे.
या पत्रकार परिषदेतील पवारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

0 Comments