नेमकी घटना काय?
४ मे २०२६ रोजी सारंगपूर भागातील सतर्क ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली की, परिसरात काही संशयास्पद तरुण फिरत आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांनी आपल्या पथकासह सापळा रचला. यावेळी एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे लोखंडी बनावटीची गावठी बंदूक (कट्टा), दारूगोळा आणि एक चोरीची मोटारसायकल मिळून आली.
घराची झडती आणि शस्त्रांचा साठा
प्राथमिक चौकशीत समोर आले की, आरोपीकडे असलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल ही मालेगाव (जि. वाशिम) येथून चोरी करण्यात आली होती. पोलिसांना अधिक संशय आल्याने त्यांनी आरोपीच्या शेंदला (ता. मेहकर) येथील घरात थेट 'कोंबिंग ऑपरेशन' राबवले. या धाडसी कारवाईत पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले:
१ लोखंडी बनावटीचा गावठी कट्टा
बंदुकीची दारू आणि १७२ नग छर्रे
१ धारदार लोखंडी तलवार
चोरीची काळ्या रंगाची मोटारसायकल
इतर घातक साहित्य
कोण आहे तो गुन्हेगार?
या प्रकरणी पोलिसांनी धरमसिंग प्रतापसिंग बावरी (वय २७ वर्ष, रा. शेंदला) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपीने आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास आता पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल करत आहेत.
पोलिसांचे कौतुक:
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.
जागरूक राहा, सतर्क राहा! आपल्या परिसरात अशी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.

0 Comments