मेहकर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
एखाद्या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटालाही लाजवेल असा थरार मेहकर तालुक्यात पाहायला मिळाला. ज्या मुलाच्या अपहरणामुळे अख्खं पोलीस दल आणि कुटुंब हादरून गेलं होतं, तोच मुलगा या संपूर्ण कटाचा 'मास्टरमाइंड' निघाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तब्बल ४० तोळे सोन्याची खंडणी उकळण्याच्या उद्देशाने रचलेला हा बनाव मेहकर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उघडकीस आणला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी रायपूर येथील जनार्दन काळे यांनी आपला मुलगा चेतन जनार्दन काळे (१९) हा बीएससीची परीक्षा देण्यासाठी कॉलेजला गेला होता, मात्र तो घरी परतला नसल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. काही वेळातच वडिलांच्या मोबाईलवर एक धक्कादायक व्हिडिओ धडकला. व्हिडिओमध्ये चेतनचे हात-पाय बांधलेले होते आणि तो ओलीस असल्याचं दिसत होतं.
४० तोळे सोन्याची अजब मागणी!
अज्ञाताने वडिलांना धमकी दिली की, "तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, जर त्याला जिवंत पाहायचे असेल तर ४० तोळे सोने घेऊन एकट्याने शेगाव रेल्वे स्टेशनला या." या एका मेसेजमुळे काळे कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली.
पोलिसांची एन्ट्री अन् सुटला गुंता...
प्रकरणाचं गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगवान केली. तपासाचे धागेदोरे नाशिक जिल्ह्यातील लासलगावपर्यंत पोहोचले. तिथल्या एका शेतातून पोलिसांनी चेतन काळे आणि त्याचा मित्र विवेक सखाराम काकडे (२६) यांना ताब्यात घेतले.
खळबळजनक खुलासा!
पोलिसांनी जेव्हा या दोघांची कसून चौकशी केली, तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत असल्याने चेतन आणि विवेकने मिळून स्वतःच्याच अपहरणाचा हा 'बनावट' प्लॅन तयार केला होता. स्वतःच्याच घरातून मोठी रक्कम किंवा सोने उकळण्यासाठी त्यांनी हा भयानक मार्ग निवडला होता.
ही धाडसी कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. संतोष खाडे, पो.नि. व्यंकटेश्वर आलेवार, सपोनी अशोक अवचार, सपोनी संदीप बिरांजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडली.
.jpeg)
0 Comments