नेमकी घटना काय?
शेगाव शहरातील आदर्श नगर परिसरातील रहिवासी हेमंतकुमार अनंतराम शुक्ला यांना १५ ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत अज्ञात सायबर भामट्यांनी मोबाईल आणि व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला. आरोपींनी स्वतःची ओळख 'सीबीआय अधिकारी' म्हणून करून दिली. त्यांनी शुक्ला यांना खोट्या माहितीच्या आधारे घाबरवले की, त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करण्यात आला असून त्यांचे बँक खाते मनी लाँड्रिंगमध्ये आढळले आहे.
असा रचला 'डिजिटल अरेस्ट'चा सापळा
आरोपींनी शुक्ला यांना घाबरवण्यासाठी त्यांना तासनतास व्हिडिओ कॉलवर ठेवले, ज्याला सायबर भाषेत 'डिजिटल अरेस्ट' म्हटले जाते. अटक, चौकशी आणि कायदेशीर कारवाईची प्रचंड भीती दाखवून त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. या भीतीपोटी शुक्ला यांनी आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने २५ लाख रुपये जमा केले.
पोलिसांत तक्रार दाखल
काही दिवसांनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हेमंतकुमार शुक्ला यांनी बुलडाणा सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी ३ मे २०२६ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू आहे.
सायबर पोलिसांचे आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे:
कोणतीही सरकारी यंत्रणा किंवा पोलीस फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे कोणालाही 'डिजिटल अरेस्ट' करत नाही.
जर कोणी फोनवर पैशांची मागणी केली किंवा कारवाईची धमकी दिली, तर घाबरू नका.
अशा प्रकारचे संशयास्पद कॉल आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी किंवा सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.


0 Comments