शेंदुरजनमध्ये अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचा दणका! दोन टिप्परसह ४०.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

साखरखेर्डा (गावकरी टाइम्स/जुबेर शाह)
मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुरजन शिवारात अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करत दोन टिप्पर आणि ६ ब्रास रेतीसह तब्बल ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोहेकॉ/५१२ डिंगांबर मंगलसिंग चव्हाण यांना २८ मे रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, मलकापूर पांगरा ते शेंदुरजन मार्गावरून काही टिप्पर चालक विनापरवाना गौण खनिज रेतीची वाहतूक करून तिची जादा दराने विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.

यानंतर शेंदुरजन शिवारातील बळीराजा फॅमिली रेस्टॉरंटसमोर पोलिसांनी नाकाबंदी केली. दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास संशयित दोन टिप्पर अडवून त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनांमध्ये कोणतीही वैध परवानगी नसताना रेती वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.

या धडक कारवाईत सिग्मा कंपनीचा टिप्पर (क्र. NL-01-AD-4434), अशोक लेलँड टिप्पर (क्र. MH-28-BB-4099) आणि ६ ब्रास रेती असा एकूण अंदाजे ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मल्हारी सुदाम भुसारी (रा. बारलिंगा), भगवान तुकाराम धारे (रा. निमगाव गुरु), उमेश रामराव गायकवाड (रा. हिवरखेड पूर्णा) आणि उमेश नामदेव डोईफोडे (रा. बारलिंगा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच गौण खनिज अधिनियम १९५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या कारवाईत पोलीस कर्मचारी सुनिल देशमुख, उमेश घुगे, किशोर सांगळे, सुनिल गाडे, कैलास गाडे, बद्री शिंदे, पंढरीनाथ जाधव आणि विलास जायभाये यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामदास वैराळ करीत आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments