मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मेहकर येथील सोनाटी रोडवर असलेल्या मल्टि हॉस्पिटलच्या बाजूला २८ मे २०२६ रोजी रात्री १०:०० वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. आजूबाजूच्या नागरिकांनी या घटनेची माहिती तात्काळ मेहकर पोलिसांना दिली. माहिती मिळताच मेहकर पोलीस स्टेशनच्या पथकाने कसलाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळ गाठले आणि मृतदेहाचा पंचनामा केला.
मृतकाची ओळख पटवणे सुरुवातीला पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. त्यावर मात करण्यासाठी पोलिसांनी मृतकाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले व जनतेला ओळख पटवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मृतकाच्या नातेवाईकांनी २९ मे रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास मेहकर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली.
ज्ञानेश्वर सिताराम खोसरे (वय ३५ वर्ष) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मूळचे लोणार तालुक्यातील अजिसपूर येथील रहिवासी असून, सध्या चिखली तालुक्यातील वाघजाळ येथे वास्तव्यास होते. मृतकाच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे तीव्र उन्हाच्या दाहकतेमुळे म्हणजेच उष्माघातानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेहकर पोलिसांनी मृतदेह स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या शवगृहात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
घटनास्थळी भेट देणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी:
संतोष खाडे - उपविभागीय पोलीस अधिकारी
व्यंकटेश आलेवार - ठाणेदार, मेहकर
बिरांजे - पोलीस उपनिरीक्षक
कांचन जारवाल - पोलीस उपनिरीक्षक
लक्ष्मण कटक - पोलीस हेडकॉन्स्टेबल
प्रभाकर शिवणकर - पोलीस कर्मचारी
सभ्य नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, सध्या मे महिन्याचे शेवटचे दिवस सुरू असून उन्हाची दाहकता अत्यंत तीव्र आहे. नागरिकांनी विनाकारण दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव करावा.

0 Comments