ब्रेकिंग न्यूज: मेहकरमध्ये वाईन बारच्या आडून सुरू असलेला हायप्रोफाईल कुंटणखाना उध्वस्त; हॉटेल मालकासह दोघे जेरबंद!


मेहकर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
मेहकर शहरातील डोणगाव रोडवरील 'हॉटेल शिवराज वाईन बार व्हेज अँड नॉनव्हेज' या ठिकाणी राजरोसपणे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर मेहकर पोलिसांनी बुधवारी (२७ मे) रोजी धाड टाकून देहव्यापार उध्वस्त केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी हॉटेल मालकासह दोन आरोपींना अटक केली असून पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.


मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मेहकर शहरातील डोणगाव रोडवर प्रमोद धोंडगे याच्या मालकीचे हॉटेल शिवराज वाईन बार आहे. या ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून, त्यांना देहव्यापार करण्यास प्रवृत्त केले जात होते. सामाजिक दृष्ट्या हा अत्यंत गलिच्छ धंदा सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

अशी झाली पोलीस कारवाई:

या बेकायदेशीर व्यवसायाबाबत मेहकर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार मेहकर पोलीस ठाण्याचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांनी बुधवारी २७ मे रोजी सव्वाचार वाजेच्या सुमारास हॉटेल शिवराज वाईन बार येथे सापळा रचून अचानक छापा टाकला. या छाप्यात देहव्यापार चालविणारे दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. विजय विष्णू लादे (वय ३६ वर्षे, रा. संतोषी मातानगर, मेहकर)
२. प्रमोद मुरलीधर धोंडगे (वय ४८ वर्षे, रा. चनखोरे कॉलनी, मेहकर) - हॉटेल मालक

मुद्देमाल जप्त आणि गुन्हा दाखल:

पोलिसांनी केलेल्या या कारवाई दरम्यान आरोपींच्या ताब्यातून मोबाईल आणि इतर साहित्यासह एकूण १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच तेथील पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई केशव अवचार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३, ४, ५, ६, ७ आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची धडक कारवाई ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ लक्ष्मण कटक आणि शिवनकर पुढील तपास करीत आहेत. मेहकर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments