लोणार आणि परिसरात रात्रीच्या व पहाटेच्या अंधाराचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा आणि वाहतूक होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच महसूल प्रशासनाला जाग आली आहे. या बातमीची गंभीर दखल घेत लोणारच्या महसूल अधिकाऱ्यांनी आज थेट रस्त्यावर उतरून धडक मोहीम राबवली आणि अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडून मोठी कारवाई केली.
बातमी प्रसिद्ध होताच अधिकाऱ्यांची ‘सिंघम स्टाईल’ नाकाबंदी
लोणार परिसरातील मुख्य रस्त्यांवरून महसूल प्रशासनाची नजर चुकवून रेतीची सर्रास अवैध वाहतूक सुरू असल्याचे वृत्त वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते. बातमी समोर येताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. अधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या पथकासह तातडीने मंठा रोड येथे सापळा रचून नाकाबंदी केली. महसूल विभागाच्या या अचानक आणि धडक कारवाईमुळे अवैध रेती वाहून नेणाऱ्या माफियांचे आणि वाहनचालकांचे धाबे दणाणले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लाखो रुपयांचा दंड ठोकणार; कडक कारवाईचे आदेश
या धडक कारवाईत अवैध रेती वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली असून, त्यांच्यावर लाखो रुपयांचा दंडात्मक बडगा उगारण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे.
"अवैध रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील," असा कडक इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
'गावकरी टाइम्स'च्या वृत्ताची घेतली दखल
गेल्या काही दिवसांपूर्वी, म्हणजेच १५ मे २०२६ रोजी 'गावकरी टाइम्स' मध्ये लोणार परिसरातील अवैध रेती वाहतुकीबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. महसूल प्रशासनाची नजर चुकवून मुख्य रस्त्यांवरून रेतीचे ट्रॅक्टर आणि ट्रक कसे धावतात, याचे वास्तव या बातमीतून समोर आणले होते. या बातमीची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली
या अधिकाऱ्यांनी दाखवला इंगा:
ही धडक व कौतुकास्पद कारवाई उपविभागीय अधिकारी सानप साहेब, नायब तहसीलदार मयूर इप्पर साहेब आणि ग्राम महसूल अधिकारी सचिन शेवाळे यांच्या पथकाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून केली.
बातमी प्रसिद्ध होताच अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेचे आणि धडक कारवाईचे लोणारकरांकडून जोरदार स्वागत होत असून, नागरिकांनी माध्यमांचे आभार मानले आहेत.

0 Comments