जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात २६ एप्रिल रोजी सापडलेल्या 'त्या' शिरविरहित आणि अर्धवट जळालेल्या मृतदेह प्रकरणाने आता एक अत्यंत नाट्यमय आणि न भूतो न भविष्यती असा वळण घेतले आहे. ज्या विवाहित तरुणीची हत्या केल्याच्या आरोपाखाली बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तिच्या सख्ख्या वडिलांना आणि भावाला तुरुंगात डांबले होते, ती तरुणी चक्क जिवंत निघाली आहे! ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याने संपूर्ण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
"मी जिवंत आहे, माझ्या वडिलांना सोडा!"
मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह शिवानी कलमेकर (भिलावेकर) हिचा असल्याचे सांगत पोलिसांनी तिचे वडील बापूराम कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांना अटक केली होती. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, गुरुवारी ही तरुणी स्वतः तिच्या प्रियकरासोबत थेट बुऱ्हाणपूर पोलिसांसमोर हजर झाली.
"मी जिवंत आहे, माझ्या वडिलांना आणि भावाला चुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे, त्यांना तात्काळ सोडा!" अशी आर्त साद तिने पोलिसांकडे घातली आहे. सध्या तिला बुऱ्हाणपूर येथील 'सखी वन स्टॉप सेंटर' मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून पुढील तपासासाठी जळगाव जामोद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलिसांनी मारहाण करून गुन्हा कबूल करून घेतला? काकांचा गंभीर आरोप!
या धक्कादायक प्रकारानंतर शिवानीचे काका नारायण कलमेकर यांनी बुलढाणा पोलिसांवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. "एक दिवस अचानक बुलढाणा पोलीस आमच्या घरी आले आणि तुम्हीच तुमच्या मुलीचा खून केला आहे, असा थेट आरोप केला. माझ्या भावाला आणि पुतण्याला बेदम मारहाण करून पोलिसांनी त्यांच्याकडून हा खोटा गुन्हा बळजबरीने कबूल करून घेतला. माझे भाऊ आणि पुतणे पूर्णपणे निर्दोष आहेत," असे नारायण कलमेकर यांनी सांगितले आहे.
बुलढाणा LCB च्या घाईघाईच्या तपासावर मोठे प्रश्नचिन्ह!
काही दिवसांपूर्वी या हत्येचा छडा लावल्याचे सांगत प्रसिद्धीपत्रक काढणाऱ्या बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) कार्यपद्धतीवर आता नागरिकांमधून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत:
DNA अहवालाची वाट का पाहिली नाही?: मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी DNA चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची घाई का केली?
केवळ संशयावरून तपास?:
केवळ संशयाच्या आणि गुलाबी सँडलसारख्या प्राथमिक पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी संपूर्ण तपासाची दिशा ठरवून निष्पाप लोकांना तुरुंगात धाडले का?
तपासाचे क्रेडिट घेण्याची घाई नडली?: झटपट तपास केल्याबद्दल ज्या पोलिसांचे कौतुक होत होते, त्यांच्याच पायाखालची जमीन आता सरकली आहे.
आता सर्वात मोठे गूढ: 'तो' मृतदेह नेमका कोणाचा?
शिवानी चक्क जिवंत समोर आल्यामुळे आता मूळ प्रकरणाचे गूढ अधिकच गडद आणि भयानक झाले आहे.
राजुरा शिवारातील जंगलात सापडलेले 'ते' मुंडके आणि अर्धवट जळालेले धड नेमके कोणत्या दुर्दैवी महिलेचे आहे?
तिचा खरा मारेकरी कोण आहे, जो अद्यापही मोकाट फिरत आहे?
या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणते मोठे रॅकेट किंवा गंभीर गुन्हेगारी गुपित दडलेले आहे?
या महाट्विस्टनंतर आता खऱ्या मृत व्यक्तीची ओळख पटवणे आणि खऱ्या आरोपींना जेरबंद करणे हे पोलीस अधीक्षक (SP) निलेश तांबे आणि बुलढाणा पोलिसांसमोर एक सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लागले आहे.

0 Comments