जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात काही दिवसांपूर्वी आढळलेल्या त्या छिन्नविछिन्न आणि अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. ज्या बापाने मुलीला लहानाचे मोठे केले, त्याच बापाने भावाच्या मदतीने आपल्या विवाहित मुलीचा अत्यंत क्रूरपणे काटा काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चारित्र्याच्या संशयावरून केलेल्या या 'ऑनर किलिंग'ने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
नेमकी घटना काय?
मृत महिलेचे नाव शिवानी प्रकाश भिलावेकर (वय २०, रा. खडक, जि. बुऱ्हाणपूर) असे आहे. शिवानीचा विवाह १५ एप्रिल २०२६ रोजी धारणी येथील तरुणाशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच ती माहेरी आली होती. मात्र, शिवानीचे तिच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय तिचे वडील बापूराम नथ्थू कलमेकर यांना होता. २३ एप्रिलच्या रात्री याच कारणावरून घरात वाद झाला आणि संतापलेल्या बापूरामने बांबूने शिवानीच्या डोक्यात प्रहार करून तिची हत्या केली.
पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी सैतानी डोकं
हत्या केल्यानंतर बापूराम आणि शिवानीचा भाऊ अजय कलमेकर यांनी अत्यंत अमानवीय कृत्य केले:
रात्रभर मृतदेह घरात: हत्येनंतर मृतदेह रात्रभर घरातच लपवून ठेवला.
दुचाकीवरून प्रवास: दुसऱ्या दिवशी मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवरून मध्य प्रदेशातून थेट महाराष्ट्रातील राजुरा शिवारात आणला.
ओळख मिटवण्याचा प्रयत्न: ओळख पटू नये म्हणून त्यांनी शिवानीचे शिर धडावेगळे केले आणि मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न केला. धड आणि मुंडके वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देऊन ते फरार झाले.
पोलिसांचा १२ दिवसांचा थरारक तपास
राजुरा शिवारात शिर नसलेला मृतदेह आढळल्यानंतर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तपासाची चक्रे फिरवली. मृतदेहाजवळ सापडलेली गुलाबी चप्पल, काळी पोत आणि स्कार्फ हेच तपासाचे मुख्य दुवे ठरले. पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या पथकाने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बेपत्ता महिलांची माहिती गोळा केली. दरम्यान, ९ मे रोजी बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकणार पोलीस ठाण्यात शिवानी बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यावर पोलिसांचा संशय बळावला.
आरोपी जेरबंद
पोलिसांनी वडील बापूराम आणि भाऊ अजय यांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. "मुलगी ऐकत नव्हती, म्हणून रागाच्या भरात खून केला," असे धक्कादायक उत्तर आरोपींनी दिले.
तपास पथकाची कामगिरी:
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय सुनील अंबुलकर, सपोनि यशोदा कणसे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने या गुन्ह्याचा छडा लावला. आरोपींना सध्या जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हे नाते कसले?
ज्या हातांनी लेकीला कन्यादान केले, त्याच हातांनी तिची हत्या करून तिचे तुकडे करावेत, या घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे. या भीषण हत्याकांडामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

0 Comments