सुलतानपूर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल, तर नियतीलाही झुकावे लागते, याचे ज्वलंत उदाहरण सुलतानपूर येथील सय्यद रेहान सय्यद हसन याने घालून दिले आहे. अत्यंत हलाखीची घरची परिस्थिती आणि अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच वडिलांचे निधन झालेले असतानाही, दुःखावर मात करत रेहानने महाराष्ट्र पोलीस दलात एकाच वेळी तीन ठिकाणी (पुणे शहर पोलीस, सोलापूर SRPF आणि पुणे येरवडा जेल पोलीस) निवड होऊन दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या यशाबद्दल सुलतानपूर येथील ए.आय.एम.आय.एम. दारुसलाम येथे त्याचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
संघर्षातून गाठले यशाचे शिखर
रेहानची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. तीन महिन्यांपूर्वीच वडिलांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशा कठीण काळात खचून न जाता, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रेहानने रात्रंदिवस मेहनत घेतली. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, "भाऊ तीन ठिकाणी पोलीस झाला" अशा आशयाचे फलक सोशल मीडियावर झळकत आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
या सत्कार सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून रेहानचे कौतुक केले. यामध्ये स्टार ग्रूपचे अध्यक्ष शेख अख्तर भाई, उपसरपंच नागवंशी संघपाल पनाड, ग्रामीण पतसंस्था संचालक शेख जमीर साहेब, माजी सरपंच सय्यद मुख्तार, ए.आय.एम.आय.एम. शहर अध्यक्ष असीम पठाण, ग्रामपंचायत सदस्य शेख आमिर भाई, सद्दाम भाई, जाकीर भाई, माजी सदस्य मुशब्बर मुल्लाजी, मुकद्दर पठाण, शेख शाहरुख, सय्यद हबीब, अहेमद लाला, सय्यद इम्रान, शेख अजहर, आबीद मुल्लाजी व इतर ग्रामस्थांचा समावेश होता.
तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण
मान्यवरांनी रेहानला शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविले. यावेळी बोलताना मान्यवर म्हणाले की, "रेहानने दाखवून दिले की गरिबी ही प्रगतीच्या आड येत नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते." गावातील इतर तरुणांनीही रेहानचा आदर्श घेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून देशसेवेसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे संपूर्ण सुलतानपूर परिसरात आनंदाचे वातावरण असून, रेहानवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
.jpeg)
0 Comments