लोणार तालुक्याचा हिरा चमकला! ज्ञानेश्वर हाडे न्यायाधीश पदावर विराजमान


बोरखेडी/सुलतानपूर(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
 
कोणत्याही यशामागे प्रचंड जिद्द आणि सातत्य असेल, तर परिस्थितीवर मात करता येते, हे बोरखेडीच्या ज्ञानेश्वर रामेश्वर हाडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (CJJD & JMFC) परीक्षेत ज्ञानेश्वर यांनी घवघवीत यश संपादन केले असून त्यांची न्यायाधीश पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ६ वा क्रमांक पटकावून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

 


शून्यातून निर्माण केले विश्व
ज्ञानेश्वर यांची ही वाटचाल सोपी नव्हती. अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून आणि कौटुंबिक संघर्षातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आल्यानंतरही खचून न जाता, त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे उत्तुंग यश मिळवले. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, हे यश म्हणजे त्यांच्या आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टांचे आणि पाहिलेल्या स्वप्नांचे फलित मानले जात आहे. 


गावाकडून शुभेच्छांचा वर्षाव 
ज्ञानेश्वर यांच्या या निवडीमुळे बोरखेडी आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पत्रकार सागर पनाड, शेख खाजा शेख उमर, शेख हबीब शेख उमर तसेच कष्टकरी संघ सुलतानपूर यांच्या वतीने ज्ञानेश्वर यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. "ज्ञानेश्वरचे यश हे केवळ त्याचे वैयक्तिक यश नसून, ग्रामीण भागातील प्रत्येक कष्टकरी तरुणासाठी ती एक प्रेरणा आहे. जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही, हे त्याने दाखवून दिले." — उपस्थित मान्यवरांच्या भावना

  ज्ञानेश्वर हाडे यांनी मिळवलेले हे यश स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. त्यांच्या या 'उंच भरारी' बद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments