मलकापूर पांग्रा येथे दुचाकी आणि लोडिंग रिक्षाची धडक; दोन तरुण जागीच ठार.


सिंदखेडराजा (गावकरी टाइम्स/सय्यद सादीक): एकीकडे लग्नाचा उत्साह आणि दुसरीकडे काळाचा घाला, अशीच एक हृदयद्रावक घटना सिंदखेडराजा तालुक्यातील मांडवा फाट्यावरील टी-पॉईंटवर घडली आहे. भरधाव दुचाकी आणि लोडिंग रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील रोशन नांदुरकर (वय २९) आणि शुभम वंजाळे (वय २८) हे दोन तरुण पुण्याहून बीबी येथे एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास, लग्नाचे कार्य आटोपून आपल्या गावी परतत असताना मांडवा फाट्यावरील वळणावर त्यांच्या दुचाकीची (MH 27 BH 6276) समोरून येणाऱ्या लोडिंग रिक्षाशी (MH 50 5364) जोरदार धडक झाली.

जागीच मृत्यू आणि उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

हा अपघात इतका भीषण होता की, रोशन नांदुरकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर शुभम वंजाळे हे गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत शुभम यांना मलकापूर पांग्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचीही प्राणज्योत मालवली.

प्रशासनाची धाव

अपघाताची माहिती मिळताच बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील, रवी चव्हाण आणि दिनेश चव्हाण,अरुण मोहिते हे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात मोलाचे सहकार्य केले.

अंजनगाव सुर्जीवर शोककळा

लग्नाचा आनंद घेऊन घरी परतणाऱ्या या दोन उमद्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचे वृत्त समजताच त्यांच्या मूळ गावी, अंजनगाव सुर्जी येथे शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments