ज्या केबिनमध्ये बसून मालकाने ४ वर्षे 'गल्ला' भरला, त्याच जमिनीखाली दडलं होतं भयानक रहस्य; मेहकरमधील त्या 'मर्डर मिस्ट्री'चा थरारक उलगडा!



मेहकर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी)
एखाद्या क्राइम थ्रिलर चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल अशी एक अंगावर शहारे आणणारी घटना मेहकर तालुक्यात उघडकीस आली आहे. ज्याला घरचे चार वर्षांपासून बेपत्ता समजून शोधत होते, त्याचा घात चक्क त्याच्याच मित्रांनी केला होता. धक्कादायक बाब म्हणजे, खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह आपल्याच हॉटेलच्या केबिनखाली गाडला आणि त्याच जागी बसून तो गेली चार वर्षे आपला व्यवसाय करत होता.
सुकळी (ता. मेहकर) येथील रहिवासी असलेले विनोद अश्रुबा नवले (३८) हे पेशाने ट्रक चालक होते. २९ एप्रिल २०२२ रोजी ते कामाला जातो असे सांगून घरातून पडले आणि अचानक बेपत्ता झाले. १ मे २०२२ रोजी त्यांचा भावासोबत शेवटचा संवाद झाला, त्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही. १९ मे २०२२ रोजी कुटुंबीयांनी मेहकर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला, अगदी दुसऱ्या राज्यातही धाव घेतली, पण विनोद यांचा काहीच सुगावा लागला नाही. सरतेशेवटी, विनोद आता जिवंत नसावेत अशी भीती कुटुंबीयांच्या मनात घर करून गेली होती. 

पत्नीच्या एका तक्रारीने फिरली तपासाची चक्रे 
या प्रकरणाचा छडा लागण्यास कारणीभूत ठरली ती आरोपीची पत्नी. आरोपी सचिन उगले हा आपली पत्नी निकिता हिला सतत त्रास देत होता. वादाच्या वेळी तो तिला विनोदच्या खुनाचा संदर्भ देऊन 'तुझंही असंच करीन' अशी धमकी द्यायचा. या छळाला कंटाळून निकिताने १७ एप्रिल रोजी पोलीस ठाणे गाठले आणि पतीच्या त्या धमकीचा खुलासा केला. पोलिसांनी ही धागा पकडून तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांचा ताफा मागे लागल्याचे पाहताच सचिन उगले याने शरणागती पत्करली आणि चार वर्षांपूर्वीच्या त्या काळ्या रात्रीचा उलगडा झाला. 

पार्टी, वाद आणि निर्घृण खून 
आरोपी सचिन उगले याचे मेहकर-मोळा रस्त्यावरील जामगाव शिवारात हॉटेल होते. याशिवाय तो व्याजाचा व्यवसायही करायचा. त्याचा मित्र सुनील जाधव याने विनोद नवले यांना व्याजाने पैसे दिले होते. २ मे २०२२ रोजी सचिन आणि सुनीलने विनोदला हॉटेलवर बोलावले. तिथे तिघांनी दारू आणि मटणाची पार्टी केली. मात्र, पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात वाद झाला आणि संतापलेल्या सचिन व सुनीलने धारदार शस्त्राने विनोदचा खून केला. 

पुराव्यांची विल्हेवाट आणि 'त्याच' जागी व्यवसाय 
भरदुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी हॉटेलच्या केबिनखालीच एक मोठा खड्डा खणला आणि विनोदचा मृतदेह तिथे पुरून वरून सिमेंटचे बांधकाम केले. त्यानंतर तब्बल चार वर्षे सचिन त्याच केबिनमध्ये बसून हॉटेल चालवत होता आणि पैसे कमवत होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने हे भयानक गुपित काळजात दडवून ठेवले होते. 

जेसीबीने उकरला सांगाडा 
सचिनने दिलेल्या कबुलीजबाबांनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जेसीबीच्या साहाय्याने हॉटेलची ती केबिन उकरण्यात आली. जमिनीखाली विनोद नवले यांचा केवळ सांगाडा आणि कपड्यांचे अवशेष उरले होते. आपल्या माणसाची ही अवस्था पाहून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. 

सध्या मेहकर पोलिसांनी सचिन उगले आणि सुनील जाधव या दोन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या यशस्वी तपासाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, या घटनेतील क्रूरतेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments