वंचितांच्या झोपडीत उजळला 'माणुसकीचा' दिवा; रक्ताच्या नात्यापलीकडची अनोखी भाऊबीज; सुलतानपूरच्या युवकांनी पारधी वाडीवर फुलवली हास्याची दिवाळी!

सुलतानपूर, ता. १२ (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी) :
"जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा..." संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाची प्रचिती सुलतानपूर येथील विवेकानंद स्टडी सेंटरच्या युवकांनी प्रत्यक्ष कृतीतून आणून दिली आहे.

समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पेरण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही सेवाभावी परंपरा यंदाही तितक्याच उत्साहात आणि आपुलकीने पार पडली.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा आणि आनंदाचा सण! मात्र, आर्थिक विवंचनेमुळे समाजातील अनेक घटकांना या सणाचा आनंद मनमुराद लुटता येत नाही. अशा गरजू कुटुंबांच्या आयुष्यातही दिवाळीचा प्रकाश पोहोचावा, या उदात्त हेतूने विवेकानंद स्टडी सेंटरने सामाजिक बांधिलकीचा हा वसा घेतला आहे.


यंदा ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेच्या पवित्र मुहूर्तावर स्टडी सेंटरच्या सदस्यांनी पारधी वाडी-वस्तीवर जाऊन वंचित बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पारधी समाजातील महिला, लहान मुले आणि गरजू कुटुंबांना नवीन कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले. हातात नवीन कपडे पडताच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला निरागस आनंद आणि माता-भगिनींच्या डोळ्यांत दाटलेली कृतज्ञता उपस्थितांचे मन हेलावून टाकणारी होती.

केवळ मदत नव्हे, तर आपुलकीचा संवाद
हा उपक्रम केवळ वस्तूंच्या वाटपापुरता मर्यादित न राहता, वाडी-वस्तीवरील बांधवांशी मनमोकळा संवाद साधणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यावर विशेष भर देण्यात आला. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकीचे नाते कसे जपता येते, याचा आदर्शच या भाऊबीज सोहळ्याने घालून दिला.


यांनी घेतला पुढाकार
या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. आनंद झोरे, पत्रकार वसंत जुमडे, सागर पनाड, सुनिल हरकाळ यांच्यासह मोहन जैन, विकास राजपूत, विजय ढव्हळे, भूषण दंडे, विवेक कडुकर,दामोधर कुडके, गोपाल शेळके आदींनी विशेष पुढाकार घेतला. तसेच विवेकानंद स्टडी सेंटरचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी सामाजिक एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला.

दहा वर्षांची अखंड सेवापरंपरा!
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात स्वतःचा विचार करण्यापलीकडे जाऊन, सलग दहा वर्षे वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य करणे हीच खरी सामाजिक संपत्ती आहे. "माणुसकी हाच खरा धर्म आणि सेवाभाव हेच खरे कर्म" या उक्तीला साजेशी कृती करणाऱ्या विवेकानंद स्टडी सेंटरच्या सर्व युवकांचे सुलतानपूर परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments