ती एक चूक अन् होत्याचे नव्हते झाले... मुलाच्या 'स्टोरी'चा राग बापाच्या जीवावर बेतला; मेहकर तालुक्यातील थरारक घटना!

मेहकर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): सोशल मीडियावरील एका क्षुल्लक चुकीची किंमत एका निष्पाप पित्याला स्वतःचा जीव देऊन चुकवावी लागल्याची अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना मेहकर तालुक्यातील भालेगाव येथे घडली आहे. १६ वर्षीय मुलाने ठेवलेली एक 'इन्स्टाग्राम स्टोरी' वादाचे कारण ठरली आणि या वादाचे रूपांतर अमानुष मारहाणीत होऊन वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नीलेश अशोकराव निकम असे मृत वडिलांचे नाव असून, या घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


नेमकं प्रकरण काय?
मृत नीलेश निकम यांचा १६ वर्षीय मुलगा अमरावती येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकतो. २ ऑक्टोबर रोजी या विद्यार्थ्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका महापुरुषाच्या छायाचित्रासह काही वादग्रस्त मजकूर असलेली स्टोरी पोस्ट केली होती. २४ तासांनंतर ही स्टोरी आपोआप डिलीटही झाली होती. मात्र, ३ ऑक्टोबर रोजी मेहकरमधील एका तरुणाने या विद्यार्थ्याला फोन करून जाब विचारला. त्यावेळी विद्यार्थ्याने तात्काळ आपली चूक मान्य करत माफी मागितली होती. तरीही, "मेहकरला आल्यावर तुला दाखवून देऊ," अशी धमकी त्याला देण्यात आली होती.

दुपारी समेट, संध्याकाळी थरार
हा वाद मिटवण्यासाठी १० नोव्हेंबर रोजी दुपारी मुलाच्या नातेवाईकांनी मेहकर येथे जाऊन संबंधित तरुणांची भेट घेतली आणि दिलगिरी व्यक्त केली. त्यावेळी "आम्ही आमच्या पद्धतीने पाहून घेऊ," असे सूचक उत्तर समोरून मिळाले होते. विशेष म्हणजे, त्याच दिवशी दुपारी एका तरुणाने विद्यार्थ्याला फोन करून "माफी मागितल्यामुळे तुला यावेळी सोडत आहोत, पुन्हा अशी चूक करू नको," असे सांगितले होते. त्यामुळे प्रकरण निवळल्याचे वाटत असतानाच संध्याकाळी भयानक वळण लागले.

बापाच्या छातीत दुखत असतानाही जमावाची क्रूरता
१० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काही तरुण दुचाकींवरून भालेगाव येथील नीलेश निकम यांच्या घरासमोर धडकले. त्यांनी १६ वर्षीय विद्यार्थ्याला घराबाहेर बोलावले आणि त्याला मारहाण सुरू केली. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वडील नीलेश निकम मध्ये पडले असता, जमावाने त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर पिता-पुत्राला गावातील वाटिका परिसरातील महापुरुषाच्या पुतळ्याजवळ नेण्यात आले. तेथे पुन्हा माफी मागण्यास भाग पाडून दोघांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.

या मारहाणीदरम्यान वडिलांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याचे सांगत मुलाने जमावाकडे हात जोडून मारहाण थांबवण्याची विनवणी केली. मात्र, संतापलेल्या जमावाने त्याकडे दुर्लक्ष करत मारहाण सुरूच ठेवली. इतकेच नव्हे, तर मुलगा माफी मागत असतानाचा व्हिडिओ चित्रित करून तो व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली. या प्रचंड धक्क्याने आणि मारहाणीमुळे नीलेश निकम यांना चक्कर आली आणि ते जागीच कोसळले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने मेहकर येथील गाभणे रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांची मोठी कारवाई; १५ जण गजाआड
वडिलांच्या अचानक जाण्याने धक्का बसलेल्या मुलाने ११ नोव्हेंबर रोजी मेहकर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्रीतच धडक कारवाई करत १५ आरोपींना बेड्या ठोकल्या असून, फरार असलेल्या उर्वरित ५ आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

गावात तणावपूर्ण शांतता
घटनेनंतर भालेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सोशल मीडियावरील वादाचे रूपांतर अशा प्रकारे जीवघेण्या हिंसाचारात होत असल्याने नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments