काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुःखावर मायेची फुंकर! आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या दारात पोहोचली माणुसकीची दिवाळी; मंडळ अधिकारी विष्णू केंद्रे यांचा स्वखर्चातून मदतीचा हात



लोणार (गावकरी टाइम्स/किशोर मोरे):
दिवाळी म्हटले की प्रत्येक घरात आनंद, उत्साह, रोषणाई आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. मात्र ज्या घरातील कर्ता पुरुष काळाच्या पडद्याआड गेला, त्या घरात दिवाळीचे दिवे तर लागतात; पण मनातील अंधार मात्र सहज दूर होत नाही. अशाच दुःखाचा डोंगर पेलणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात मायेचा छोटासा प्रकाश निर्माण करण्याचे संवेदनशील काम हिरडवचे मंडळ अधिकारी विष्णू केंद्रे यांनी केले.


दिवाळीच्या सणानिमित्त त्यांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता स्वतःच्या खिशातून स्वखर्चाने सात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना किराणा किट भेट देत माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले. गुंजखेड, बागूलखेड, आरडव, जाबुल, पिंपळनेर आदी गावांतील कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांनी ही मदत पोहोचविली.

शेतकरी आत्महत्येनंतर मागे राहिलेल्या कुटुंबीयांना केवळ आर्थिक संकटाचाच सामना करावा लागत नाही, तर आयुष्यभराची भावनिक पोकळीही सोबत घेऊन जगावे लागते. सण-उत्सवांच्या काळात ही उणीव अधिक तीव्रतेने जाणवते. अशा परिस्थितीत एखाद्याने आपुलकीने विचारपूस करणे, मदतीचा हात पुढे करणे आणि आपल्या दुःखात कुणीतरी सहभागी आहे, याची जाणीव करून देणे, हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असते.

या उपक्रमांतर्गत संतोष त्र्यंबक सुलताने, आकाश गजानन पहाड, विठ्ठल दत्तात्रय सुलताने, रमेश ज्ञानबा हाडे, खुशाल विश्वास कुटे, परमेश्वर भगवान मुळे आणि अमोल भगवान आघाव यांच्या कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी गुंजखेडचे सरपंच प्रल्हाद सुलताने, पोलीस पाटील विद्या सरपाते, वामनराव हाडे, अबराव हाडे, वैभव खोलगडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

अधिकारी म्हणून आदेश देणारे अनेकजण असतात; मात्र अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळताना माणूस म्हणून दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणारे हात विरळच असतात. विष्णू केंद्रे यांनी केलेला हा उपक्रम केवळ किराणा किटचे वाटप नसून दुःखाने खचलेल्या कुटुंबांना दिलेला मायेचा आधार आहे. दिवाळीच्या रोषणाईपेक्षा माणुसकीचा हा दिवा अधिक प्रकाशमान ठरला असून, त्यांच्या या संवेदनशील उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments