देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांड: अनवर शेख व आरिफ पठाण खून प्रकरणात २० संशयित गजाआड, शहरात तगडा बंदोबस्त!

देऊळगाव राजा (गावकरी टाइम्स विशेष प्रतिनिधी):
कव्वालीच्या कार्यक्रमानंतर लहान मुलांच्या वादातून पेटलेला संघर्ष थेट दुहेरी हत्येपर्यंत पोहोचल्याने देऊळगाव राजा शहरात खळबळ उडाली आहे. शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक अनवर शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी (अजित पवार गट) संबंधित आरिफ शेख यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंविरुद्ध गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत २० आरोपींना जेरबंद केले आहे.  


परस्परविरोधी तक्रारींतून धक्कादायक खुलासे

पहिली फिर्याद (आरिफ शेख   हत्या प्रकरण):
शेख अतिक शेख उमर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तक्रारीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी प्रतापनगर परिसरातील भोलेशा दर्ग्याजवळ शेख अकीब शेख पाशू व इतर साथीदारांनी पूर्वनियोजित कट रचून चाकू, लाकडी दांडे आणि कुऱ्हाडीने हल्ला चढवला. या हल्ल्यात ३५ वर्षीय आसीफ उर्फ आरिफ हारून पठाण यांचा जबर मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  

दुसरी फिर्याद (नगरसेवक अनवर शेख हत्या प्रकरण):
दुसऱ्या बाजूने शेख मुजाहिद शेख अली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शाहरुख खान अहमद खान व इतरांनी एकत्र येत जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रॉड, चाकू आणि काठ्यांनी ४२ वर्षीय नगरसेवक शेख अनवर उर्फ अनु शेख अली यांच्यावर प्राणघातक वार करून त्यांचा खून करण्यात आला. या तक्रारीवरूनही संबंधित आरोपींवर खुनासह गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.  

पोलीस अधीक्षक घटनास्थळी; २० संशयित गजाआड
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तातडीने देऊळगाव राजा येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले आहेत.  

स्थानिक गुन्हे शाखा आणि देऊळगाव राजा पोलिसांच्या विशेष पथकांनी धडक कारवाई करत आतापर्यंत २० जणांना ताब्यात घेतले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात तणाव टाळण्यासाठी दंगल नियंत्रण पथक (RCP) आणि क्यूआरटी (QRT) पथकासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी आणि सहायक पोलीस निरीक्षक सविता कुवारे करत आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments