शेतकऱ्यांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवले? आमदार संजय गायकवाड यांच्या निलंबनाची शक्यता; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ



बुलढाणा(गावकरी टाइम्स विशेष प्रतिनिधी):
शेतकऱ्यांविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या विधानाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या घडामोडींमुळे बुलढाण्यासह संपूर्ण राज्यभरात राजकीय खळबळ उडाली आहे, मात्र अद्याप या आदेशाला पक्षाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 


नेमका वाद काय?

शेतकरी आत्महत्यांबाबत बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. 'आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नये,' असा आशय त्यांच्या वक्तव्यातून निघत असल्याचा आरोप विरोधक व शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या संकटात सापडलेल्या बळीराजाबद्दल लोकप्रतिनिधींनी संवेदनशील राहणे अपेक्षित असताना अशा प्रकारच्या विधानामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शेतकऱ्यांसाठी सातत्याने मदतीचे निर्णय घेत असताना, अशा विधानांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना पक्षनेते व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचे समजते.  

विरोधकांची आक्रमक भूमिका आणि कारवाईची मागणी
या प्रकरणी विरोधी पक्ष आक्रमक झाला असून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी गायकवाड यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गायकवाड यांनी तात्काळ शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. दुसरीकडे, युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन करत गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

दरम्यान, वादावर स्पष्टीकरण देताना आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की, "आपले वक्तव्य हे शेतकऱ्यांच्या विरोधात नव्हते, तर नापिकीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याबाबतच्या संदर्भात होते."  

पक्षाच्या अधिकृत भूमिकेकडे लक्ष
सध्या समोर आलेली निलंबनाची माहिती ही पक्षांतर्गत कारवाईच्या सूत्रांवर आधारित असून, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आता पक्षप्रमुख यावर अंतिम काय निर्णय घेतात आणि गायकवाड यांच्यावर खरोखरच निलंबनाची कुऱ्हाड कोसळणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.  
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments