घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना बीबी (ता. लोणार) येथे २१ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीबी येथील रहिवासी वैभव खुशालराव नागरे यांच्या घरी ही घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास घरातील पाच जण गाढ झोपेत असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाट फोडून १२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि १० ग्रॅम वजनाची सोन्याची एकदानी असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
सकाळी कुटुंबीय झोपेतून उठले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे आणि कपाटातील दागिने गायब असल्याचे लक्षात आले.
यानंतर नागरे यांनी तातडीने बीबी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच ठाणेदार गजानन सोनटक्के यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. तपासासाठी बुलढाणा येथून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.
गाढ झोपेत असलेल्या ५ जणांच्या देखत झालेल्या या धाडसी चोरीमुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. ठाणेदार सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

0 Comments