'गावकरी टाइम्स'च्या बातमीचा दणका! वाढदिवसाच्या दिवशीच्या उपोषणापूर्वीच मेहकर आगार प्रशासन नमले; कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य

सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या लढ्याला घवघवीत यश; सतीश पाटलांच्या वाढदिवसाआधीच कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे 'गिफ्ट'

मेहकर(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी)
बुलढाणा विभागातील मेहकर आगारातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर 'सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ' (महाराष्ट्र राज्य) चे विभागीय कार्याध्यक्ष तथा आंदोलन सम्राट सत्यनारायण परमेश्वर तेजनकर उर्फ सतीश पाटील तेजनकर यांनी स्वतःच्या ४० व्या वाढदिवशी (१८ ऑगस्ट) पुकारलेल्या आमरण अन्नत्याग उपोषणाला मोठे यश आले आहे.
सदर आंदोलनाची आणि कर्मचाऱ्यांच्या व्यथांची 'गावकरी टाइम्स'ने घेतलेली विशेष दखल आणि प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे प्रशासकीय व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या बातमीच्या इम्पॅक्टमुळे अखेर आगार प्रशासनाने नमते घेत सतीश पाटील तेजनकर यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर कर्मचाऱ्यांच्या सर्व ६ प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या आहेत.

'गावकरी टाइम्स'चा इम्पॅक्ट आणि लोकप्रतिनिधींचे आदेश

कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी वाढदिवशीच उपोषणाला बसण्याच्या सतीश तेजनकर यांच्या निर्धाराची बातमी 'गावकरी टाइम्स' ने लावून धरली होती. या आंदोलनाची गंभीर दखल घेत कामगार मंत्री मा. ना. आकाशदादा फुंडकर आणि संघटनेच्या ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी तातडीने विभाग नियंत्रक, बुलढाणा यांना लेखी पत्र देऊन आंदोलनातील मागण्यांवर तात्काळ योग्य कार्यवाही करण्याचे कडक आदेश दिले होते.

१४ ऑगस्टच्या बैठकीत तोडगा; सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय

वरिष्ठांच्या आदेशानंतर व आंदोलनाच्या दबावामुळे मेहकर आगार प्रशासनाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी सेवाशक्ती कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळासोबत तातडीची बैठक बोलावली. आगार व्यवस्थापक हर्षल साबळे व वाहतूक निरीक्षक अतुल सोनवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन त्या मान्य करण्यात आल्या:
सेवा ज्येष्ठतेचा काटेकोर वापर: आगारात चालक-वाहकांना इतर वापर करताना महामंडळाच्या नियमांनुसार निव्वळ सेवा ज्येष्ठतेचाच विचार केला जाईल.
चालक जी. के. कुमरे यांना न्याय: चालक श्री. जी. के. कुमरे यांना त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार इतर वापरात कर्तव्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंढरपूर यात्रेचा मोबदला व साप्ताहिक सुट्टी: २०२६ च्या पंढरपूर वारीदरम्यान साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कर्तव्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार सुट्टी आणि उर्वरित सर्व आर्थिक मोबदला मंजूर करण्यात आला.
रात्रराणी ड्युटीवर क्रू चेंज: मेहकर ते त्र्यंबकेश्वर (शेड्यूल क्र. ११०/१११) या रात्रराणी मार्गावरील चालकांना नियमानुसार क्रू चेंजची कामे देण्याची मागणी मान्य झाली.
ओव्हर टाईमचा प्रश्न: सुपर डे व सुपर नाईटमधील सर्व शेड्यूल्सना नियमानुसार ओव्हर टाईम मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी तात्काळ पत्रव्यवहार करून प्रश्न मार्गी लावण्यात येईल.
सुट्टीच्या दिवशी स्पेअर ड्युटी: शनिवार, रविवार व शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी किंवा ऐनवेळी किलोमीटर रद्द झाल्यामुळे ड्युटी न मिळालेल्या चालकांना नियमानुसार कर्तव्य अथवा स्पेअर दिले जाईल.

कर्मचाऱ्यांमध्ये जल्लोष; प्रशासनाचे मानले आभार

या यशस्वी चर्चेसाठी संघटनेचे अमरावती प्रादेशिक व बुलढाणा विभागीय अध्यक्ष शिवाजी आनंदे, विभागीय सचिव सुनील पाटील, मेहकर आगार अध्यक्ष तेजराव तेजनकर, सचिव प्रताप राजगुरू यांच्यासह अनेक पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागण्या मान्य झाल्याने उपोषणाचा लढा यशस्वी ठरला असून संपूर्ण मेहकर आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल 'गावकरी टाइम्स' चे तसेच मागण्या मान्य केल्याबद्दल आगार व्यवस्थापक हर्षल साबळे व वाहतूक निरीक्षक अतुल सोनवणे यांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.

"कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा संघर्ष असाच सुरू राहील, अन्यायाविरुद्ध आवाज नेहमी बुलंद राहील आणि संघटित ताकदीच्या जोरावर प्रत्येक रास्त मागणी पूर्ण करून घेऊ!"
— सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments