“लोणारच्या अथर्वची मॉस्कोवर झेप! २,५०० विद्यार्थ्यांमधून शिष्यवृत्तीसह निवड”



लोणार (गावकरी टाइम्स/किशोर मोरे)
लोणारच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरणारे यश अथर्व मापारी यांनी संपादन केले आहे. लोणार येथील प्रतिष्ठित डॉ. भास्कर मापारी व वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता मापारी यांचे सुपुत्र अथर्व मापारी यांची रशियातील मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ पेडागॉजी अँड टेक्नॉलॉजी येथे पुढील अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसह निवड झाली आहे.

अथर्व सध्या पंजाब येथील एल.पी. विद्यापीठात बी.टेक.च्या सायबर सिक्युरिटी विषयात स्पेशलायझेशन करीत आहेत. मॉस्को विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतीत त्यांनी आपल्या गुणवत्तेची चमक दाखवत उल्लेखनीय कामगिरी केली. या निवड प्रक्रियेत तब्बल २,५०० विद्यार्थ्यांमधून अथर्व यांची निवड करण्यात आली आहे.
अथर्व यांना बी.टेक.च्या तृतीय वर्षानंतरच्या पुढील शिक्षणासाठी रशियातील विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती मिळाली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश लोणारसह संपूर्ण परिसरासाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.
लहानपणापासूनच अभ्यासू आणि गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळख असलेल्या अथर्व यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या या कामगिरीमुळे लोणार परिसरातील विद्यार्थ्यांसमोर आंतरराष्ट्रीय शिक्षणाची नवी प्रेरणादायी वाट निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, अथर्व यांना नुकताच रशियन फेडरेशनचा व्हिसा प्राप्त झाला असून, येत्या २३ ऑगस्ट रोजी ते रशियासाठी रवाना होणार आहेत. सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील उच्च शिक्षण घेऊन भविष्यात या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे.
आपल्या या यशाचे श्रेय अथर्व यांनी आई-वडील, गुरुजन आणि मार्गदर्शकांना दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लोणार शहरासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अथर्व यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
लोणारच्या मातीतून मॉस्कोपर्यंतचा हा प्रवास निश्चितच अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments