लोणार तालुक्यातील बिबी शहरात सालाबादप्रमाणे याही वर्षी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे १२ ऑगस्ट रोजी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण बिबी नगरी सज्ज झाली असून, गावकऱ्यांच्या वतीने वारकरी मंडळी व पालखीचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.
स्वच्छता आणि फटाक्यांची आतषबाजी
पालखीच्या स्वागतासाठी एक दिवस आधी, म्हणजेच ११ ऑगस्ट रोजीच बिबी येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन पालखीच्या मुख्य मार्गाची स्वच्छता केली होती. १२ ऑगस्ट रोजी पालखीचे बिबी शहरात आगमन होताच मलकापूर फाटा येथे फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. "गण गण गणात बोते" च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी बिबी शहरासह परिसरातील हजारो भावीकांनी मलकापूर फाटा व मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. श्रींचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून दर्शनाचा लाभ घेतला.
पावसाच्या पार्श्वभूमीवर वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था
पालखीचा मुक्काम वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय, बिबी येथे आयोजित करण्यात आला होता. सध्या पावसाचे दिवस असल्याने वारकरी मंडळी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून आयोजकांच्या वतीने विशेष वॉटरप्रूफ मंडपाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
या भक्तिमय सोहळ्यामुळे संपूर्ण बिबी शहरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 Comments