देऊळगाव माळी येथील विश्वशांती बुद्ध विहाराच्या विकासासाठी २ कोटींच्या निधीची मागणी; सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना निवेदन

मेहकर/देऊळगाव माळी (गावकरी टाइम्स/नूर खान पठाण):
बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असलेल्या देऊळगाव माळी (ता. मेहकर) येथील विश्वशांती बुद्ध विहार, बुद्ध टेकडी च्या सर्वांगीण विकासासाठी २ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात यावा, अशी आग्रही मागणी ‘सम्यकक्रांती सोशल फोरम’च्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. संजयजी शिरसाट यांची छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतचे लेखी निवेदन सादर करण्यात आले.


विविध सामाजिक उपक्रमांचे केंद्र:
विश्वशांती बुद्ध विहार
देऊळगाव माळी येथील बुद्ध टेकडीवर लोकवर्गणीतून भव्य व प्रशस्त विश्वशांती बुद्ध विहार उभारण्यात आले आहे. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, बौद्धिक आणि धम्म प्रबोधनाचे उपक्रम राबवले जातात. यामध्ये:
धम्म प्रशिक्षण शिबीरे व श्रामणेर शिबीरे
सामूहिक विवाह सोहळे आणि धम्म परिषदा

संविधान जनजागृती, व्यसनमुक्ती व महिला सक्षमीकरण कार्यक्रम

युवा नेतृत्व प्रशिक्षण आणि नामवंत प्रबोधनकार, कवी व गायकांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम
या सर्व उपक्रमांमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून तसेच परिसरातून हजारो उपासक-उपासिका आणि पर्यटक दररोज या विहारास भेट देतात. मात्र, येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून निधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

२ कोटींच्या निधीतून ‘या’ कामांची केली मागणी

मंत्री महोदयांना देण्यात आलेल्या निवेदनात बुद्ध टेकडी परिसराच्या सौंदर्यीकरणासह आणि पायाभूत सुविधांसाठी खालील प्रमुख कामांचा समावेश करण्यात आला आहे:
संरक्षण भिंत, स्वागत कमान आणि सांची व विद्यापीठ गेटची प्रतिकृती
भिखू-भिखुनी निवास, भक्त निवास आणि विपश्यना ध्यान धारणा हॉल
भोजन हॉल, स्वयंपाक गृह, मंगल कार्यालय आणि प्रशिक्षण हॉल
स्वतंत्र महिला-पुरुष प्रसाधन गृहे, पाण्याची टाकी व नळ योजना
महाकाय बुद्ध मूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मूर्ती
चवदार तळे प्रतिकृती, शॉपिंग कॉम्प्लेक्स, खुले रंगमंच व प्रशासकीय कार्यालय
'संविधान भवन'च्या उद्घाटनास उपस्थित राहण्याचे आश्वासन
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव आणि माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या विशेष मार्गदर्शनातून व सहकार्यातून निर्माण झालेल्या "संविधान भवन" च्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्यास मुख्य उद्घाटक म्हणून उपस्थित राहावे, असे विनंती पत्र माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या मार्फत देण्यात आले. या निमंत्रणाचा स्वीकार करत मंत्री ना. संजय शिरसाट यांनी लवकरात लवकर तारीख देऊन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

प्रमुख उपस्थिती व स्वाक्षरीकर्ते

या भेटीदरम्यान सम्यकक्रांती सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. गजेंद्र गवई, सचिव प्रा. केशव गवई, कोषाध्यक्ष वसंतराव गवई, संचालक अर्जुन गवई व संजय गवई यांनी मंत्री महोदयांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. गजेंद्र गवई, उपाध्यक्ष राजेंद्र गवई, सचिव प्रा. केशव गवई, सहसचिव किशोर वानखेडे, कोषाध्यक्ष वसंतराव गवई, संचालक सदस्य संतोष मोरे, कान्होबा गवई, जगाराव गवई, विजय ज. गवई, पुंजाजी गवई, भिकाजी गवई, अर्जुन गवई, संजय रा. गवई, सदाशिव गवई, शशिकांत जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments