खामगाव-जालना रेल्वे प्रकल्प: ५४ गावे, १६२ किमी मार्ग आणि भूसंपादनाचा 'मोठा अपडेट'!जाणून घ्या ५४ गावांची संपूर्ण यादी.


बुलढाणा (गावकरी टाइम्स/विशेष प्रतिनिधी):
महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षीत खामगाव - जालना १६२ किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या कामाला आता मोठा वेग मिळाला आहे. या रेल्वे मार्गासाठी बुलढाणा जिल्ह्यातील ५ तालुक्यांमधील ५४ गावांची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ कार्यालयाकडून बुलढाणा जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून जमीन संपादन प्रक्रियेसाठी आवश्यक सहकार्याची मागणी करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने २६ मे २०२६ रोजी या रेल्वे प्रकल्पाची विशेष अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता प्रशासकीय स्तरावर प्रत्यक्ष जमिनीच्या संपादनाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.


पारदर्शक पद्धतीने पार पडणार जमीन संपादन प्रक्रिया
जमीन संपादनाचे काम रेल्वे कायद्याच्या नियमांनुसार पार पाडले जाणार आहे. यासाठी बुलढाणा येथील विशेष भूसंपादन अधिकारी तसेच खामगाव, बुलढाणा आणि सिंदखेड राजा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांची (SDO) विशेष सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हे अधिकारी खालील बाबींची प्रत्यक्ष पाहणी व कारवाई करतील:
जमिनीचे सर्वेक्षण व मालकी हक्काची तपासणी.
बाधित शेतकरी व जमीन मालकांच्या माहितीची पडताळणी.
योग्य मोबदला (मुआवजा) निश्चित करणे.
हरकतींवर सुनावणी घेऊन कायदेशीर आणि वेळेच्या मर्यादेत पारदर्शक प्रक्रिया पूर्ण करणे.
सर्व बाधित व्यक्तींना नियमानुसार आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल.

तालुकानिहाय ५४ गावांचा समावेश

प्रस्तावित रेल्वे मार्गाचे अंतिम

अलाइनमेंट (मार्ग) आधीच निश्चित झाले आहे. या मार्गामध्ये बुलढाण्यातील पुढील ५४ गावांमधील जमिनीचा समावेश आहे:

शेगाव तालुका (२ गावे): वरखेड खुर्द आणि पहुरजिरा.
खामगाव तालुका (१३ गावे): जयपूर लांडे, शेलोडी, टेंभुर्णा, जनुना, जळका तेली, नागपूर, किन्ही महादेव, नायदेवी, लोखंडा, पाला, शिराळा, गणेशपूर आणि निमखेड.
चिखली तालुका (२० गावे): बैरागड, उंद्री, किन्ही सवर्ण, तोरणवाडा, मोहदरी, अमरापूर, टाकरखेड मुस्लिम, महिमळ, दहीगाव, बोरगाव काकडे, पेठ, अनवी, बोरगाव वसू, सिंधहरी, खंडाळा, मकरध्वज, कोलारा, रोहडा, मेरा खुर्द, भोरसा आणि आसोला.
सिंदखेड राजा तालुका (३ गावे): जळगाव उगला, पिंपळखटा इत्यादी.
देऊळगाव राजा तालुका (१६ गावे): अंधेरा, धोत्रा नांद, सरंबा, देऊळगाव मही, निमगाव गुरू, सावंगी टेका, पिंपळगाव बामखेड, आसोला, पळसखेड झालटा, बोराखेडी, बावरा, अंबोरा, गिरोली खुर्द, पिंपळनेर, सावखेड भोई आणि भावगाव.

क्षेत्राच्या विकासाला मिळणार नवीन दिशा

हा रेल्वे मार्ग या भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे:
उद्योगांना चालना: स्थानिक उद्योगांना अधिक प्रभावी व सोपी वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.

शेतकऱ्यांना फायदा: शेतकऱ्यांचा कृषी माल देशातील विविध मोठ्या बाजारपेठांपर्यंत जलद गतीने पोहोचवणे शक्य होईल.
प्रवासी वाहतूक: खामगाव व जालन्या दरम्यान थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.

गुंतवणूक: भविष्यात या भागात औद्योगिक गुंतवणुकीला मोठा वाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments