तालुक्यात सुरुवातीला हजेरी लावणाऱ्या पावसाने अचानक पाठ फिरवल्याने येथील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी (दांडी) मारल्यामुळे ८० टक्के पूर्ण झालेल्या पेरण्या आता वाया जाण्याच्या मार्गावर असून, कोवळी पिके कडक उन्हामुळे होरपळून जाऊ लागली आहेत.
पिके करपण्यास सुरुवात
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरिपाच्या पेरण्यांना वेग दिला होता. आतापर्यंत तालुक्यात तब्बल ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पेरणीचे काम आटोपताच मागील सात ते आठ दिवसांपासून पावसाने अचानक गायब होणे पसंत केले आहे. पावसाअभावी आणि वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा संपला असून, नुकतीच उगवून आलेली पिके आता उन्हाच्या तडाख्याने होरपळू लागली आहेत.
कर्ज आणि गहाण सोन्याची चिंता
यंदाचे वर्ष चांगले जाईल आणि दोन पैसे हाती येतील, या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी बँकांकडून, तर काहींनी सावकारांकडून कर्ज काढून पेरणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेकांनी आपल्या घरातील सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवून महागडे बियाणे आणि खतांची जुळवाजुळव केली होती. मात्र, निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांनी केलेली लाखो रुपयांची गुंतवणूक आता मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
"अशीच कोरडी परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास, शेतातील उभी पिके पूर्णपणे बरबाद होऊन जातील. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आमच्यावर आता दुबार पेरणीचे आणि थेट उपासमारीचे संकट ओढावेल," अशी उद्विग्न प्रतिक्रिया स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत.
सध्या देऊळगाव राजा तालुक्यातील बळीराजा अत्यंत तणावाखाली असून, त्याचे डोळे पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे लागले आहेत. वरुणराजाने लवकरात लवकर हजेरी लावावी, अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत. तसेच, शासनाने आणि कृषी विभागाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

0 Comments