लोणार आगाराची किनगाव जट्टू येथे मुक्कामी असलेल्या एसटी बसला (एमएच ४० वाय ५०३८) काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली होती. सुरुवातीला ही आग शेतकरी आंदोलकांनी लावल्याची चर्चा आणि अफवा पसरल्या होत्या, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. मात्र, फॉरेन्सिक टीमने (Forensic Team) आज सकाळी केलेल्या तपासणीत ही आग कोणत्याही आंदोलनाने किंवा घातपाताने लागली नसून तांत्रिक बिघाडामुळे लागल्याचे सत्य समोर आले आहे.
नेमकी घटना काय घडली?
ही बस काल रात्री किनगाव जट्टू येथे मुक्कामी आली होती. रात्री ८ ते साडेआठच्या सुमारास बस स्थानक आणि ग्रामपंचायत समोरील शाळेजवळ काही स्थानिक नागरिक व मुले बसलेली असताना, त्यांना अचानक बसमधून धूर निघताना दिसला.
नागरिकांनी तातडीने बसच्या दिशेने धाव घेतली. बसच्या मागच्या बाजूने, तिसऱ्या क्रमांकाच्या सीटजवळून हा धूर येत होता. बसच्या सर्व काचा बंद (Lock) असल्याने आतील धूर बाहेर पडत नव्हता आणि त्यामुळे संपूर्ण गावात जळल्याचा उग्र वास पसरला होता.
गावकऱ्यांची सतर्कता आणि पाण्याचे टँकर
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावातील तरुण आणि नागरिकांनी तात्काळ धावपळ सुरू केली. त्यांनी बसच्या काचा फोडल्या आणि अनवर पटेल यांनी तातडीने पाण्याचा टँकर बोलावून घेतला.शेख सखावत यांच्या मालकीची पाण्याची टाकी रिकामी करून, गावकऱ्यांनी अथक प्रयत्नांनंतर बसला लागलेली आग आटोक्यात आणली. गावकऱ्यांच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
फॉरेन्सिक तपासणीत सत्य आले समोर
आज सकाळी या घटनेचा सविस्तर तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. टीमने केलेल्या तपासणीनुसार, गाडीचा मुख्य स्विच (Switch) चालूच राहिल्यामुळे गाडीच्या पाठीमागील तिसऱ्या नंबरच्या सीटवरील ट्यूबलाईटमध्ये अचानक शॉर्ट सर्किट (Spark) झाले. या शॉर्ट सर्किटची ठिणगी थेट सीटवर पडली आणि त्यातूनच या बसने पेट घेतला, अशी अधिकृत माहिती फॉरेन्सिक टीमने दिली आहे. त्यामुळे रात्री पसरलेली आंदोलकांनी बस पेटवल्याची बातमी पूर्णपणे चुकीची आणि अफवा ठरली आहे
पोलिसांत अकस्मात जळाची नोंद
या संपूर्ण प्रकरणाची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून, माननीय ठाणेदार साहेब चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका रविराज चव्हाण या घटनेचा पुढील तपास करत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची 'अकस्मात जळाची' (Accidental Fire) नोंद करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीवर किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments