"अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील अनेक जाती सध्या विखुरलेल्या आणि असंघटित आहेत. नेतृत्वाच्या अभावामुळे या जातींना संघटित करणे कठीण जात आहे. यातीलच मातंग समाज हा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या प्रचंड मागे राहिला आहे. त्यामुळे या समाजाची आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची (अ, ब, क, ड वर्गवारी) मागणी अत्यंत रास्त असून, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे," असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी येथे केले.
सकल मातंग समाजाच्या वतीने मंगळवार, १६ जून रोजी मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निवेदन देण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.
२००० सालापासून मी या भूमिकेवर ठाम: ना. जाधव
आपली भूमिका स्पष्ट करताना ना. प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, "अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विषयी सर्वोच्च न्यायालयाने २०२४ मध्ये ऐतिहासिक निकाल दिला आहे; मात्र मी सन २००० मध्ये आमदार असतानाच विधिमंडळात एस.सी. प्रवर्गाचे उपवर्गीकरण झाले पाहिजे, ही न्याय्य भूमिका मांडली होती आणि आजची परिस्थिती पाहता या उपवर्गीकरणाची नितांत गरज आहे."
जिल्हास्तरीय 'मंथन बैठकी'त रणनीती निश्चित
निवेदन देण्यापूर्वी स्थानिक चनखोरे कॉलनी येथे संतराम तायडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय 'सकल मातंग समाज मंथन बैठक' आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आरक्षण उपवर्गीकरणा संदर्भातील चळवळ गावपातळीवर कशी मजबूत करायची आणि समाजाला त्याचा हक्क कसा मिळवून द्यायचा, यावर सखोल विचारमंथन करण्यात आले. या बैठकीनंतर समाज बांधवांनी एकत्र येत ना. प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
समाज बांधवांची मोठी उपस्थिती
विजय अंभोरे, साहेबराव पाटोळे आणि शांताराम तायडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी समाधान साठे, गजानन पवार, बी.के. खरात, ज्ञानदेव मानवतकर, विलास मानवतकर, शालिकराम मानकर, सुनील दुतोंडे, सोपान पाटील, भगवान गायकवाड, भास्कर अगम, ओमप्रकाश नाटेकर, मदन रत्नपारखी, दत्तात्रय बोरकर, प्रभाकर आवारे, दिगंबर पाटोळे, प्रदीप साळवे, एस.एल. डोंगरे, रामभाऊ जाधव, प्रभाकर धोंगडे, रविंद्र अंभोरे, कृष्णा नाटेकर, मनीष पाटोळे, कुंदन यंगड, बबनराव रत्नपारखी, बबनराव डोंगरे, एन. जी. वानखेडे, टी. एस. दुतोंडे, एम. आर. तौर, विनोद दुतोंडे, आर. एम. अंभोरे, रमेश बोरकर, ज्ञानेश्वर दोंगरदिवे, चंदू साठे, विजय दुतोंडे, तुषार नेमाडे, आसाराम देवकुळे, निंबाजी साळवे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व मातंग समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव मानवतकर यांनी केले, सूत्रसंचालन महादेव बावरे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन बबनराव रत्नपारखी यांनी केले.

0 Comments