जळगाव जामोद (जि. बुलढाणा) पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका खळबळजनक महिला हत्याकांडातील मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी लोणार पोलिसांनी कंबर कसली आहे. या मृत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी आणि जनमानसात जागृती निर्माण करण्यासाठी लोणार पोलीस ठाण्यात शुक्रवारी एका विशेष 'जनजागृती बैठकीचे' आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत गावपातळीवरील शासकीय यंत्रणा आणि महिला कार्यकर्त्यांच्या मदतीने व्यापक शोधमोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांवर मोठी जबाबदारी
लोणार पोलीस ठाण्यात सकाळी ११:३० ते १२:४५ या वेळेत पार पडलेल्या या बैठकीला आशा वर्कर्स, आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, तालुका आरोग्य अधिकारी, महिला अभय केंद्र अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे गावपातळीवरील सुमारे १०० ते ११० कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत जळगाव जामोद परिसरात घडलेल्या या हत्याकांडाची सविस्तर माहिती देऊन पोलिसांकडून तपासाला गती देण्याचे आवाहन करण्यात आले.
माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय राहणार; ५० हजारांचे बक्षीस
लोणारचे पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
"आपल्या कार्यक्षेत्रात किंवा गावातून एखादी महिला बेपत्ता झाली आहे का, याची सखोल पडताळणी करण्यात यावी. संबंधित महिलेबाबत किंवा कोणत्याही संशयास्पद बाबीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा."
तसेच, या गुन्ह्यातील मृत महिलेची ओळख पटवून देणाऱ्या किंवा महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या व्यक्तीला ₹५०,००० (पन्नास हजार रुपये) चे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले असून, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाहीही पोलिसांनी दिली.
गावागावांत लावणार मृत महिलेचे पोस्टर्स
बैठकीदरम्यान उपस्थित महिला कार्यकर्त्यांना मृत महिलेचे छायाचित्र असलेले पोस्टर्स वितरित करण्यात आले. ही पोस्टर्स प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय, बस स्थानक, चौक आणि इतर प्रमुख सार्वजनिक ठिकाणी लावून जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गावपातळीवरील या प्रभावी यंत्रणेच्या मदतीने मृत महिलेची ओळख पटवून आरोपींपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. नागरिकांनीही या मोहिमेत पोलिसांना सढळ हस्ते सहकार्य करावे, असे आवाहन लोणार पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
.jpeg)
0 Comments