सुलतानपुरात पोलिसांचा धाक संपला? आधी दुचाकी, मग केबल,आता सोलर स्टार्टर; सुलतानपूरचे शेतकरी संकटात.



सुलतानपूर(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
सुलतानपूर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, पोलिसांचा चोरांवर कोणताही धाक राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याच्या शेतातील सोलर वायर चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच, आता सुलतानपूर-मेहकर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या मन्नान खान पठाण यांच्या शेतातून चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास सोलर पंपाचे स्टार्टर चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.




तीन महिन्यांत दुसरी मोठी चोरी; शेतकरी हवालदील

​मिळालेल्या माहितीनुसार, मन्नान खान पठाण यांची शेती अगदी महामार्गाला लागून, सुलतानपूर-मेहकर रोडवरील पेट्रोल पंपाच्या शेजारी आहे. एवढ्या गजबजलेल्या आणि मुख्य रस्त्यावरील शेतातून चोरट्यांनी बिंधास्तपणे सोलर पंपाचे स्टार्टर लंपास केले. विशेष म्हणजे, अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच मन्नान खान पठाण यांची दुचाकी (मोटारसायकल) देखील चोरीला गेली होती. त्या चोरीचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नसताना, आता पुन्हा त्यांच्या शेतात चोरी झाल्याने पठाण यांच्यावर दुहेरी संकट ओढवले आहे.

चार दिवसांपूर्वीच मनोहर भानापुरे यांच्या शेतातही झाली होती चोरी

​सुलतानपूर शिवारात चोऱ्यांचे सत्र थांब नाव घेत नाहीये. दोन-तीन दिवसांपूर्वीच याच शिवारातील मनोहर नारायण भानापुरे यांच्या शेतातील सोलर पॅनेलच्या तारा (वायर) चोरट्यांनी कापून नेल्या होत्या. एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे.

​'आधीच पाऊस नाही, त्यात चोऱ्या; शेती कशी करावी?' शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

​"एकीकडे निसर्गाची अवकृपा आहे, पाऊस वेळेवर पडत नसल्याने शेतकरी आधीच चिंतेत आहे. अशा बिकट परिस्थितीत अल्पभूधारक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून उभी केलेली शेतीची साधने चोरीला जात आहेत. या चोरांपासून स्वतःचा बचाव कसा करावा आणि शेती कशी करावी, हेच आता समजेनासे झाले आहे."
— परिसरातील हवालदील शेतकरी

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

​महामार्गालगतच्या पेट्रोल पंपा शेजारून जर वस्तू चोरीला जात असतील, तर चोरांना पोलिसांचा कसलाच धाक उरलेला नाही हे स्पष्ट होते. रात्रीची गस्त केवळ नावापुरतीच आहे का, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. या वाढत्या चोऱ्यांचा बंदोबस्त करून मन्नान खान पठाण आणि मनोहर नारायण भानापुरे यांच्या शेतात चोरी करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी सुलतानपूरच्या शेतकऱ्यांनी केली आहे. 
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments