बीबी (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याची अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात असलेल्या 'बिबी' येथील दोन महिला भाविकांचा पाण्यात बुडून दुःखद मृत्यू झाल्याने बिबी गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास निमित्त मोठी यात्रा भरली असून, येथे दर्शनासाठी व स्नानासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत. यादरम्यान गोदावरी नदी पात्रात भाविकांनी क्षमतेपेक्षा जास्त भरलेली एक बोट अचानक उलटली. या दुर्घटनेत बिबी (ता. लोणार) येथील रहिवासी सौ. प्रमिला शेषराव राठोड (वय ५५ वर्षे) व सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६० वर्षे) या दोन महिलांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला.
माजलगाव येथे उपचार सुरू:
या अपघातात इतरही काही भाविक जखमी झाले असून, त्यांना तातडीने नदीबाहेर काढून उपचारासाठी माजलगाव येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती बिबी परिसरात मिळताच गावावर मोठी संक्रांत आली असून, सर्वत्र अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही मृत महिलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे मोठे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.

0 Comments