समृद्धी महामार्गालगतच्या 'कृषी समृद्धी नवनगरा'च्या विकासाला गती देण्यासाठी आणि स्थानिक शेतकरी व तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज नंदाताई देवानंद कायंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (MSRDC) 'नवनगर प्राधिकरण' म्हणून असलेली नेमणूक रद्द करून, आता या क्षेत्राचा 'विशेष नियोजन प्राधिकरण' (Special Planning Authority - SPA) म्हणून विकास करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) राज्य शासनाने जारी केला आहे. या निर्णयामुळे रखडलेल्या विकासकामांना आता बुलेट ट्रेनचा वेग मिळणार आहे.
नव्याने १२ ते १४ गावांचा समावेश; विकासाची व्याप्ती वाढली
यापूर्वीच्या आराखड्यात सुधारणा करत आता या विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रात अनेक गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने:
सिंदखेड राजा तालुका: नशिराबाद आणि माळ सावरगाव.
देऊळगाव राजा तालुका: अंभोरा, असोला, बामखेड, बोरखेडी बावरा, गिरोली बुद्रुक, गिरोली खुर्द, गोळेगाव, जांभोरा, जवळखेड, कुंभारी, निमखेड, पळसखेड मलकदेव, पळसखेड झाल्टा, पिंपळनेर, तुळजापूर, आणि उंबरखेड.
या सर्व गावांचा समावेश झाल्याने या संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणार आहे.
काय आहे नेमका फायदा?
शहरीकरण आणि नियोजित विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यामुळे:
१. नियोजनाचे स्वतंत्र अधिकार: विकास आराखडे तयार करणे, पायाभूत सुविधांची उभारणी आणि अंमलबजावणीचे थेट अधिकार प्राप्त होतील.
२. प्रशासकीय मंजुऱ्या जलद होणार: बांधकाम व जमिनीशी संबंधित परवानग्या जलद गतीने मिळून उद्योग-व्यापाराला मोठी चालना मिळेल.
३. आधुनिक पायाभूत सुविधा: रुंद रस्ते, सुनियोजित वाहतूक व्यवस्था, निवासी व व्यावसायिक वसाहती, शैक्षणिक संस्था, अत्याधुनिक रुग्णालये, उद्याने आणि क्रीडा संकुले यांचा विकास एकाच छत्राखाली करणे सोपे होईल.
तरुणांना रोजगार आणि शेतकरी हिताला प्राधान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनावेळी १८ कृषी समृद्धी केंद्रांची घोषणा केली होती. त्यानुसार सिंदखेड राजा मतदारसंघातील या केंद्रामुळे स्थानिक पातळीवर मोठे औद्योगिक हब तयार होणार आहे.
"नवनगर प्राधिकरणामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, ज्या सुधारण्यासाठी आम्ही सर्व विधानसभा व विधानपरिषद लोकप्रतिनिधींना एकत्र आणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे प्रश्न लावून धरला होता. आता नवा शासन निर्णय आल्यामुळे येथील शेतकरी, शेतमजूर आणि विशेषतः स्थानिक तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मतदारसंघाचा सर्वांगीण आणि आधुनिक विकास करणे हेच आमचे ध्येय आहे."
— आमदार मनोज नंदाताई देवानंद कायंदे (सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ)
शेतकऱ्यांनी भू-एकत्रीकरण (Land Pooling) योजनेतंर्गत जमिनी देण्याची तयारी दर्शवली होती, त्यांच्याही न्याय्य मागण्यांचा विचार या प्रक्रियेत वेगाने केला जात आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा परिसरातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

0 Comments