वाचन संस्कृतीला चालना; उमरदमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वाचनालयाचा शुभारंभ

"वाचनाने विद्यार्थी सुसंस्कृत होतो, ज्ञानाचा खजिना खुला होतो" – गटविकास अधिकारी अजित बांगर
साखरखेर्डा | (गावकरी टाइम्स/जुबेर शाह)
सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वाचनालयाचे उद्घाटन पंचायत समिती सिंदखेडराजाचे गटविकास अधिकारी अजित बांगर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.


यावेळी बोलताना अजित बांगर यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि त्यांच्यामध्ये चांगले संस्कार रुजतात. वाचनाची सवय लागलेला विद्यार्थी अभ्यासातही अधिक प्रगती करतो. त्यामुळे प्रत्येक शाळेत वाचनालयाची उभारणी ही काळाची गरज आहे."

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन आवश्यक

कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी निकम तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी घुगे यांनीही विद्यार्थ्यांना नियमित वाचन करण्याचे आवाहन केले. त्यांनी वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वाढ आणि शैक्षणिक प्रगती साध्य होत असल्याचे सांगितले.

शाळेत ज्ञानाचा नवा दीप प्रज्वलित

नवीन वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध होणार असून त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळणार आहे. वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांची जडणघडण होण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती

या उद्घाटन सोहळ्यास विस्ताराधिकारी पवार, दराडे, खरात, अभियंता रत्नपारखी, मुख्याध्यापक दराडे, शिंदे, घुगे, मुरकुट, पंढरीनाथ उबाळे, प्रभाकर राजे जाधव, विठ्ठल भांबर्गे, राजू शिनगारे, छगन उबाळे, सदाशिव केकान, कैलास मुंडे, दत्ता सोसे, रामेश्वर जाधव यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक शरद नागरे यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक महाडिक यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते यांनी मानले.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments