देऊळगाव राजा शहरातील सिंदखेड राजा रोडवरील पिंपळनेर येथे असलेल्या 'जूब्बूजी बायोमास ब्रिकेट इंडस्ट्री' कंपनीच्या आवारातून लाखो रुपयांचे कांदा बियाणे चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत गतीने तपास चक्र फिरवत जालना आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील तीन सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी गेलेल्या मुद्देमालासह २ मोटारसायकली आणि मोबाईल असा एकूण ५ लाख २१ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
नेमकी घटना काय होती?
देऊळगाव राजा येथील भाजीमंडी परिसरातील रहिवासी व व्यापारी मोहम्मद अझहर मोहम्मद कलंदर (वय ३६) यांनी सिंदखेड राजा रोडवरील पिंपळनेर येथील कंपनीत 'अथर्व सीड्स कंपनी'चे कांदा बियाणे प्रक्रिया करण्यासाठी ठेवले होते. २४ मे च्या रात्री ते २५ मे च्या पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या आवारातून १४ बॅगमधील ६ क्विंटल ६५ किलो वजनाचे, सुमारे ४ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे कांदा बियाणे चोरून नेले होते. याप्रकरणी २ जून रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी झाली कारवाई आणि आरोपींना अटक
गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे पथकाला चोरांचा धागादोरा मिळाला. १३ जून रोजी जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये समन्वित कारवाई करत खालील तीन आरोपींना अटक करण्यात आली:
१. अंकुश तेजराव खंदारे (वय ४०) - रा. सातेगाव, ता. जाफ्राबाद, जि. जालना.
२. विनोद विठ्ठल काळे (वय २९) - रा. लोणगाव, ता. भोकरदन, जि. जालना.
३. भानुदास उर्फ राहुल बाबुराव गायकवाड (वय ३२) - मूळ रा. देऊळगाव राजा, सध्या रा. भारस्करवाडी, शेवगाव, जि. अहिल्यानगर.
जवळपास संपूर्ण मुद्देमाल हस्तगत
पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता आरोपींनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून:
५ क्विंटल ३६ किलो कांदा बियाणे
एक युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल
एक शाईन कंपनीची मोटारसायकल
तीन मोबाईल फोन
असा एकूण ५,२१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरी गेलेल्या मालापैकी जवळपास संपूर्ण माल पोलिसांनी हस्तगत केला असून, आरोपींना पुढील कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तपास पथक
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही, उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गिरी, गजानन दराडे, जगदेव टेकाळे, युवराज राठोड, मनोज खरडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे राजू आडवे यांनी बजावली.

0 Comments