मेहकर तालुका: अन्नाच्या नावावर नागरिकांना 'विष'?व्हायरल व्हिडिओ ने खळबळ, पायाने पीठ मळणाऱ्या 'त्या' स्वीट मार्टवर कडक कारवाईची मागणी!

मेहकर/जानेफळ (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):: ग्राहक ज्या दुकानांवर विश्वास ठेवून खाद्यपदार्थ खरेदी करतात, त्याच ठिकाणी लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील एका स्वीट मार्टच्या कारखान्यामध्ये समोसे आणि कचोरीसाठी लागणारे पीठ चक्क पायाने मळले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्वीट मार्ट गेल्या १० ते १५ वर्षांपासून या परिसरात कार्यरत आहे. येथील समोसे, कचोरी आणि इतर नाश्त्याचे पदार्थ स्थानिक नागरिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. इतकेच नव्हे तर देवाच्या प्रसादासाठी लागणारे लाडू आणि पेढेही अनेक जण येथूनच विश्वासाने घेऊन जातात. मात्र, समोर आलेल्या या व्हिडिओमुळे ग्राहकांच्या विश्वासाला मोठा तडा गेला आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसले?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण लाल रंगाच्या टबमध्ये उभा राहून आपल्या पायाने पीठ मळताना स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मेहकर तालुका आणि जानेफळ परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पैशाच्या हव्यासापोटी लोकांच्या आरोग्याला धोक्यात घालणाऱ्या अशा दुकानदारांवर प्रशासनाने तातडीने आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

नागरिकांना आवाहन: आपण ज्या ठिकाणी नाश्ता किंवा खाद्यपदार्थ खरेदी करतो, तिथली स्वच्छता आणि गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे. केवळ चवीच्या मागे न धावता आरोग्याची काळजी घ्या आणि अशा प्रकारच्या निष्काळजीपणाविरुद्ध जागरूक राहा.


बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments