लोणार(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीचा विश्वास संपादन केला आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) एका जवानावर छत्रपती संभाजीनगर येथील सिडको पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नितेश राम चव्हाण (रा. तांबोळा, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या जवानाचे नाव आहे.
ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात, नंतर अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय तरुणी ही जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी आहे. वर्ष २०२३ मध्ये पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी ती छत्रपती संभाजीनगर येथे राहण्यास आली होती. याच काळात तिची ओळख लोणार तालुक्यातील तांबोळा येथील नितेश चव्हाण याच्याशी झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.
तक्रारीनुसार, १८ ऑक्टोबर २०२४ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत आरोपी नितेश चव्हाण याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून विवेकानंद नगर परिसर, सुदर्शन नगर, टीव्ही सेंटर भागातील वेगवेगळ्या खोल्या आणि लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
खाजगी फोटो काढून दिली धमकी!
प्रेमसंबंधाच्या काळात आरोपीने तरुणीचे काही खाजगी फोटो देखील आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. दरम्यानच्या काळात आरोपी नितेश चव्हाण याची 'एसआरपी' (SRPF) मध्ये नागपूर येथे निवड झाली. पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्याने पीडित तरुणीसोबत लग्न करण्यास साफ नकार दिला. एवढेच नव्हे तर, तिचे खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली, असे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.
सिडको पोलिसांत गुन्हा नोंद
जवानाने लग्नास नकार देऊन धमकी दिल्याने पीडित तरुणीला मोठा मानसिक धक्का बसला. अखेर तिने धाडस करत ११ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सिडको पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. तरुणीच्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी आरोपी SRPF जवान नितेश चव्हाण याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.


0 Comments