मेहकर(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या आदिवासीबहुल नागेशवाडी गावात दूषित पाणी पुरवठ्यामुळे डायरियाची (अतिसार) भीषण साथ पसरली आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून गावातील नागरिक या आजाराने फणफणत असतानाही, स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. संपूर्ण गावात सध्या १०० हून अधिक नागरिक बाधित असून, बाधितांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण आहे. मीडियामध्ये हे वृत्त समोर आल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या आरोग्य विभागाने अखेर शनिवारी गावात धावपळ सुरू केली आहे.
रुग्णांची प्रकृती खालावली; शासकीय रुग्णालयांकडे धाव
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारपर्यंत गावातील ३० गंभीर रुग्णांना मेहकर ग्रामीण रुग्णालय आणि जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवार १६ मे रोजी सकाळी रुग्णांची प्रकृती अधिकच खालावल्याने आणखी १४ नवीन रुग्णांना तातडीने जानेफळ येथील केंद्रात हलवण्यात आले आहे. सद्यस्थितीला ४५ हून अधिक रुग्णांवर शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू असून, उर्वरित रुग्णांवर गावातच तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय पथकाद्वारे उपचार केले जात आहेत.
५०० च्या लोकसंख्येच्या गावात बाहेरील लोकांचीच गर्दी!
नागेशवाडी गावाची एकूण लोकसंख्या अवघी ५०० च्या आसपास आहे. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावातील परिस्थिती पाहण्यासाठी विविध अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय नेत्यांचे ताफेच्या ताफे गावात दाखल होत आहेत. गावात सध्या बाहेरील सुमारे २५० ते ३०० लोकांची गर्दी झाली असून, अवघ्या ५०० लोकसंख्येच्या या गावाला जणू यात्रेचे स्वरूप आले आहे.
"साहेब, यायला खूपच उशीर केला हो!"
शनिवारी सकाळी शासकीय गाड्यांचे ताफे गावात पोहोचताच संतप्त गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. "गावाची परिस्थिती पूर्णपणे चिंताजनक झाल्यानंतर आणि जीव टांगणीला लागल्यानंतर तुम्हाला गावाची आठवण आली का?" असा उद्वेग गावकऱ्यांनी व्यक्त केला. आधी ज्या गावाचा रस्ता कोणाला माहीत नव्हता, तिथे आता केवळ बघ्यांची गर्दी जमत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार आणि लपवाछपवी
गावकऱ्यांनी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून गावात मोठ्या प्रमाणावर नागरिक आजारी पडत होते. स्थानिक पातळीवर येणारे खासगी डॉक्टर दररोज ५० ते ६० सलाईन रुग्णांना लावत होते, तरीही सरकारी यंत्रणेला याची खबर नव्हती.
धक्कादायक बाब म्हणजे, १४ मे रोजीच समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) डॉ. गवई यांनी गावाला भेट दिली असता त्यांना ६४ रुग्ण डायरियाग्रस्त आढळले होते. मात्र, इतकी गंभीर परिस्थिती असतानाही त्यांनी वरिष्ठ पातळीवर कोणतीही माहिती दिली नाही. अखेर हे वृत्त सर्वत्र पसरताच वरिष्ठ यंत्रणा जागी झाली आणि शनिवारी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली. आरोग्य पथकाने आता पाण्याचे नमुने गोळा केले असून तपासणीसाठी पाठवले आहेत.
डिजिटल युगात मोबाईल नेटवर्क गायब; संपर्कासाठी १ किमी पायपीट
एकीकडे आरोग्य आणीबाणी जाहीर होण्याची परिस्थिती असताना, नागेशवाडी गावात मोबाईलला अजिबात नेटवर्क नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गावात नेटवर्क नसल्यामुळे उपचारासाठी आलेल्या वैद्यकीय पथकाला किंवा स्थानिक कर्मचाऱ्यांना वरिष्ठांशी संपर्क साधण्यासाठी अथवा रुग्णवाहिका बोलावण्यासाठी गावातून तब्बल एक किलोमीटर दूर डोंगरभागात पायी जावे लागत आहे. नेटवर्कच्या या अभावामुळे आपत्कालीन मदतीत मोठा अडथळा निर्माण होत आहे.
'फेस रीडिंग' पुरतीच ड्युटी; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
मेहकर तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये आरोग्य सेवक आणि सेविका प्रत्यक्ष भेट देत नसल्याची ओरड आहे. अनेक कर्मचारी केवळ मुख्य कार्यालयात जाऊन 'फेस रीडिंग' (बायोमॅट्रिक हजेरी) करतात आणि घरी परततात. त्यांनी प्रत्यक्ष किती गृहभेटी दिल्या, त्यांचा दौरा रजिस्टर पूर्ण आहे का, याची कोणतीही तपासणी केली जात नाही.
नागेशवाडी येथील आदिवासी बांधवांच्या जिवाशी खेळणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी आणि केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून मेहकर तालुक्यातील आरोग्य व्यवस्था रुळावर आणावी, अशी मागणी जोर धरत आहे.

0 Comments