धक्कादायक! जाफ्राबाद-चिखली रोडवर कार झाडाला धडकून भीषण अपघात; कार चालकाचा गाडीसह होरपळून दुर्दैवी मृत्यू

चिखली(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
जाफ्राबाद-चिखली रस्त्यावर आज (रविवारी) ३१ मे पहाटेच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि खळबळजनक अपघाताची घटना घडली आहे. एक अल्टो कार थेट बाभळीच्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसताच कारने अचानक पेट घेतला. या दुर्दैवी घटनेत कार चालकाला बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने, त्याचा गाडीसह आतमध्येच होरपळून जागीच मृत्यू झाला आहे.


बाभळीच्या झाडाला जोरदार धडक

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अल्टो कार जाफ्राबाद-चिखली रोडवरून जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले असावे. नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या बाभळीच्या झाडावर प्रचंड वेगाने धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि काही क्षणांतच इंजिनने पेट घेतला.

अकोल्याच्या तरुणाचा जागीच मृत्यू

या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या कार चालकाची ओळख पटली आहे. नितीन प्रभाकर गवळी (वय ३५ वर्षे, रा. रूपचंद नगर, तालुका व जिल्हा अकोला) असे मृत तरुणाचे नाव आहे. कारला लागलेली आग इतकी भीषण होती की नितीन गवळी यांना गाडीतून बाहेर पडता आले नाही आणि ते गाडीसह पूर्णपणे जळून खाक झाले.

पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, तसेच जाफ्राबाद पोलीस ठाण्याला याची तात्काळ कल्पना देण्यात आली. जाफ्राबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी घटनेचा सविस्तर पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पोलीस तपास प्रलंबित:

 चिखली रोडवरील सरळ रस्त्यावर चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले? कार बाभळीच्या झाडाला कशी काय धडकली? आणि धडक लागल्यानंतर आग नेमकी कशामुळे भडकली? या सर्व प्रश्नांचा उलगडा पोलिसांच्या सविस्तर तपासानंतर आणि शवविच्छेदन अहवालानंतरच (Post Mortem) स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे रूपचंद नगर (अकोला) परिसरासह जाफ्राबाद परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments