साखरखेर्डा परिसरात खळबळबळ: वीज वाहक पोलवर काम करताना कंत्राटी कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू.

साखरखेर्डा (गावकरी टाइम्स/जुबेर शाह): 
साखरखेर्डा येथील वीज वितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या एका ३५ वर्षीय कर्मचाऱ्याचा विद्युत पोलवर दुरुस्तीचे काम करताना विजेचा जबरदस्त धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना मंगळवार, २६ मे रोजी पिंपळगाव सोनारा शिवारात घडली. बद्रीनाथ लक्ष्मण लंबे (वय ३५, रा. शिंदी) असे मृत कंत्राटी कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारावर आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करताना घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दिवशी सायंकाळी आलेल्या तीव्र वादळामुळे साखरखेर्डा व परिसर विस्कळीत झाला होता आणि वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. तब्बल पाच तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री १० वाजताच्या सुमारास काही भागातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, ग्रामीण भागातील वीज पुरवठा अजूनही खंडितच होता. त्यामुळे रात्री उशिरापासून ते सोमवार सकाळपर्यंत वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू होते.
पिंपळगाव सोनारा परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बद्रीनाथ लंबे हे मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मारोती आश्रू वायाळ यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मरजवळील वीज वाहक पोलवर चढून दुरुस्तीचे काम करत होते. मात्र, काम सुरू असतानाच अचानक त्यांचा वीज वाहक तारेला स्पर्श झाला. वीज प्रवाहाचा जबरदस्त धक्का लागल्याने ते गंभीररीत्या भाजून पोलवरून खाली कोसळले.

उपचारादरम्यान मृत्यू, शिंदी येथे अंत्यसंस्कार

अपघात घडताच शेतात उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने बद्रीनाथ यांना साखरखेर्डा येथील डॉ. विशाल मगर यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने चिखली येथे हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, चिखली येथे पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून, शिंदी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दोषींवर दोन दिवसांत कारवाई होणार: उपअभियंता
"कंत्राटी कामगाराच्या अपघाताची आणि मृत्यूची दोन दिवसांत सखोल चौकशी केली जाईल. यामध्ये उपकेंद्रातील हजेरी बुक गायब असणे आणि इतर बाबींची चौकशी करून जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल."
— श्रीनिवास बडगू (उपअभियंता, महावितरण, सिंदखेडराजा)

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणासंदर्भात साखरखेर्डा येथील कनिष्ठ अभियंता रोहित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. वृत्त लिहीपर्यंत साखरखेर्डा पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कोणत्याही अधिकृत तक्रारीची नोंद झालेली नव्हती. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा आणि दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments