साखरखेर्डा (गावकरी टाइम्स/जुबेर शाह): साखरखेर्डा जवळील पिंपळगाव सोनारा शिवारात वीज वाहक पोलवर काम करताना महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेले कंत्राटी कामगार स्व. बद्रीनाथ लक्ष्मण लंबे यांच्या शिंदी येथील निवासस्थानी शेतकरी नेत्या अँड. शर्वरीताई रविकांत तुपकर यांनी शुक्रवार, ३० मे रोजी सांत्वनपर भेट घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यात महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, तुपकर यांनी लंबे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि "या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत," असा विश्वास दिला.
लंबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर; गावात शोककळा
गेल्या २६ मे रोजी साखरखेर्डा परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करताना, ३३ केव्ही उपकेंद्रातील त्रुटींमुळे बद्रीनाथ लंबे (वय ३५) यांना विजेचा जबरदस्त धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला होता. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने लंबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर, अँड. शर्वरीताई तुपकर यांनी शिंदी येथे जाऊन मृत बद्रीनाथ यांच्या आई, पत्नी आणि मुलांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अत्यंत हृदयद्रावक वातावरण निर्माण झाले होते.
...तर महावितरणला धडा शिकवू; आर्थिक मदतीची आक्रमक मागणी
कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अँड. शर्वरीताई तुपकर यांनी महावितरणच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. उपकेंद्रातील 'हजेरी बुक' गायब असण्याच्या प्रकारावर शंका उपस्थित करत त्यांनी महावितरणने या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी केली.
"एक तरुण कंत्राटी कामगार महावितरणच्या चुकीच्या नियोजनामुळे जीव गमावतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे. महावितरण प्रशासनाने कोणतीही टाळाटाळ न करता लंबे यांच्या कुटुंबाला तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच शासन आणि महावितरणकडून मिळणाऱ्या सर्व विमा व शासकीय योजनांचा लाभ या कुटुंबाला मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. या न्यायाच्या लढ्यात आम्ही कायदेशीर आणि रस्त्यावर उतरूनही मदत करू."
— अँड. शर्वरीताई तुपकर (शेतकरी नेत्या)
भेटीदरम्यान 'या' प्रमुख नेत्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती
लंबे यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी अँड. शर्वरीताई तुपकर यांच्यासोबत भागातील अनेक प्रमुख सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. यामध्ये:
देविदास पिराजी सरकटे (माजी लोकसभा अपक्ष उमेदवार)
अनंता दहातोंडे
गजानन रामराव खरात
पत्रकार सचिन खंडारे
राम अंभोरे, सखाराम गवई
संजाबराव हाडे, राजू लंबे
सौ. मनोरमाताई हाडे, शरद खरात यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता लक्ष महावितरणच्या चौकशी अहवाळाकडे!
सिंदखेडराजा येथील उपअभियंता श्रीनिवास बडगू यांनी यापूर्वीच 'दोन दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे' आश्वासन दिले होते. आता अँड. शर्वरीताई तुपकर यांच्या या आक्रमक भेटीनंतर आणि वाढत्या जनक्षोभामुळे महावितरण प्रशासन दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करते आणि पीडित कुटुंबाला कधी न्याय मिळतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

0 Comments