दुसरबीड (गावकरी टाइम्स/गुलशेर शेख): समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका धावत्या खाजगी ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याची भीषण घटना घडली. चॅनल क्रमांक २९५.७०० नागपूर कॉरिडॉरवर ही घटना घडली असून, सुदैवाने मागून येणाऱ्या वाहनचालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील ३५ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स क्रमांक (MH 28 F 3899) पुण्यावरून पुसदकडे जात होती. आज दिनांक २ मे रोजी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास बसच्या मागील बाजूने अचानक धूर निघू लागला. ही बाब मागून येणाऱ्या एका वाहनचालकाच्या लक्षात आली आणि त्यांनी तत्काळ बस चालकाला याची माहिती दिली.
३५ प्रवाशांची सुखरूप सुटका; एक जखमी
माहिती मिळताच बस चालक आकाश जमदाडे (वय ३२, रा. पुसद) याने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. बसमध्ये लहान मुलांसह एकूण ३५ प्रवासी होते. आगीचे रौद्ररूप पाहता प्रवासी तातडीने खाली उतरले. या धावपळीत बबन कदम (वय ४८, रा. पुसद) यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना रुग्णवाहिकेने मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गाडी जळून खाक; चालक-वाहक फरार
पाहता पाहता आगीने संपूर्ण बसला कचाट्यात घेतले आणि काही वेळातच बस जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच पीएसआय राऊत, हेड कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल ढोले, इंगळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, बस उभी केल्यानंतर चालक आकाश जमदाडे आणि वाहक घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम देशमुख (वय २५, रा. पुसद) या प्रवाशाने पीएसआय राऊत यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. प्रशासनाने सर्व ३५ प्रवाशांना शासकीय वाहनाने सुरक्षितपणे मेहकर बसस्थानकावर पोहचवले असून, घटनास्थळी बॅरिकेटींग करण्यात आले आहे.


0 Comments