सुलतानपूर-मेहकर मार्गावरील सारंगपूर जवळ विना-सुरक्षा खड्ड्यांमुळे कार उलटली! दीड महिन्यापासून रस्त्यामध्ये मृत्यूचा सापळा!


सुलतानपूर / मेहकर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
सुलतानपूर-मेहकर रस्त्यावरील सारंगपूर जवळ सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती व क्रॅक भरण्याच्या कामात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि संबंधित ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल रात्रीच्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या एका कारचा (क्र. MH 12 WX 6943) भीषण अपघात झाला, ज्यामध्ये कार चक्क उलटली (चारही चाके वर झाली). सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कारचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे.
या गंभीर अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, "अधिकाऱ्यांना लोकांच्या जिवाची पर्वा आहे की नाही?" असा संतप्त सवाल विचारला जात आहे.



नेमका काय आहे प्रकार?

सारंगपूर जवळ गेल्या दीड महिन्यापासून रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे खणून ठेवण्यात आले आहेत. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, ऐन रस्त्याच्या मध्यभागी एवढा मोठा धोका निर्माण केलेला असतानाही संबंधित ठेकेदार किंवा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कोणतीही सुरक्षेची काळजी घेतलेली नाही.

ना बॅरिकेट्स, ना सुरक्षा रक्षक: 

अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर कुठलेही बॅरिकेट्स लावण्यात आलेले नाहीत, की रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अंदाज यावा यासाठी कोणतीही रिफ्लेक्टर किंवा दिशादर्शक पट्टी लावण्यात आलेली नाही.

नियम धाब्यावर:

या महामार्गावर गाडी चालवण्याची मर्यादा ८० किमी प्रतितास एवढी असताना, अचानक रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा ताबा सुटतो आणि अपघात घडतात. काल रात्रीचा अपघातही याच धोकादायक खड्ड्यामुळे आणि दिशादर्शकाच्या अभावामुळे झाला.

यापूर्वीही दिली होती चेतावणी; पण अधिकारी सुस्तच!

विशेष म्हणजे, या धोकादायक रस्त्याबाबत 'गावकरी टाइम्स' ने यापूर्वीही वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सातत्याने स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या, आंदोलनाचे इशारे दिले, प्रशासनाला फोटो आणि मागण्यांची निवेदने पाठवली. मात्र, असे असतानाही एमएसआरडीसीचे अधिकारी आणि ठेकेदार कुंभकर्णी झोपेतून जागे झालेले नाहीत. या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे अपघात झाले आहेत.


दीड महिन्यापासून अर्धवट टाकलेल्या या कामामुळे रोज प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असतो. या भीषण अपघातानंतर तरी एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि बेजबाबदार ठेकेदारावर गुन्हे दाखल होणार का? की अधिकारी अजून एखाद्या मोठ्या आणि जीवघेण्या अपघाताची वाट पाहत आहेत? असा संतप्त प्रश्न आता सुलतानपूर आणि मेहकर परिसरातील जनता विचारत आहे.

प्रतिक्रिया:
"या रस्त्यावर दीड महिन्यापासून खड्डे करून ठेवलेत. कोणतीही सिक्युरिटी नाही, बॅरिकेट्स नाहीत. काल रात्री कारचा भीषण अपघात झाला. आम्ही वारंवार फोटो पाठवले, तक्रारी केल्या, पण एमएसआरडीसी आणि ठेकेदार लोकांच्या जिवाशी खेळत आहेत."
— स्थानिक नागरिक व प्रत्यक्षदर्शी.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments