खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उपशाविरोधात तडेगाव फाटा येथे आमरण उपोषण सुरू


दुसरबीड (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड व राहेरी बुद्रुक येथील खडकपूर्णा नदीपात्रातून लिलावाच्या नावाखाली सुरू असलेला बेकायदेशीर रेती उपसा तात्काळ थांबवावा आणि दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने १८ मे २०२६ पासून तडेगाव फाटा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे परिसरात खळबळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


वारंवार निवेदने देऊनही कारवाई नाही; 
आंदोलकांचा आरोप आंदोलक दत्तात्रेय विनायकराव देशमुख व समस्त गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, खडकपूर्णा बचाव कृती समितीच्या वतीने मागील चार महिन्यांपासून प्रशासनाकडे तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी करण्यात येत आहेत. नदीपात्रातून पोकलन व जेसीबी सारख्या यंत्रांच्या साहाय्याने २० ते २५ फुटांपर्यंत खोल खड्डे करून सुमारे ३० ते ४० हजार ब्रास अवैध रेतीचा उपसा करण्यात आला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यामुळे नदीपात्राचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे.

शासकीय आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पाऊल यापूर्वी उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत नियमानुसार घाट चालवण्याच्या व अवैध उपशावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून केवळ तात्पुरती स्थगिती देण्यापलीकडे कोणतीही ठोस दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई कंत्राटदारावर करण्यात आली नाही. अखेर दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे गावकऱ्यांनी १८ मे पासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

मुख्य मागण्या आणि प्रशासनाला इशारा:

दुसरबीड येथील रेती घाट तात्काळ पूर्णपणे बंद करण्यात यावा.
नियमबाह्य उपसा करणाऱ्या कंत्राटदारावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी.
रेती घाटात विनापरवाना चालणारी यंत्रे व वाहने जप्त करण्यात यावीत.

आंदोलकांनी सिंदखेड राजाचे तहसीलदार, जिल्हाधिकारी बुलडाणा, विभागीय आयुक्त अमरावती आणि पोलीस प्रशासनाला यापूर्वीच ११ मे रोजी लेखी निवेदन सादर केले आहे. उपोषणादरम्यान आंदोलकांच्या आरोग्यास काही बरे-वाईट झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. 

सध्या तडेगाव फाटा येथे उपोषणस्थळी गावकऱ्यांची गर्दी जमू लागली आहे.



बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments