बंदच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्ड्यात हालचालींना वेग ; केमिस्ट असोसिएशनचे पोलीस स्टेशनला निवेदन


साखरखेर्डा(गावकरी टाइम्स/जुबेर शाह):
उद्या पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा शहरात राजकीय व सामाजिक संघटनांच्या हालचालींना वेग आला आहे. या बंद दरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी साखरखेर्डा केमिस्ट असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. असोसिएशनच्या वतीने साखरखेर्डा पोलीस स्टेशनला एक लेखी निवेदन सादर करण्यात आले असून, बंद काळात व्यापारी आणि नागरिकांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
 

व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम; सुरक्षिततेची मागणी

सध्या बंदच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापारी वर्गात काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. औषध दुकाने ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने ती सुरू ठेवताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी भावना केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच, बंददरम्यान औषध दुकानदार, इतर व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात व शहरात शांतता राखावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

पोलीस प्रशासनाचे आश्वासन:

साखरखेर्डा पोलिसांनी केमिस्ट असोसिएशनचे निवेदन स्वीकारले असून, बंददरम्यान शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सतर्क आहे. शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.

निवेदन देताना 'हे' पदाधिकारी होते उपस्थित:

निवेदन सादर करताना साखरखेर्डा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नितीनभाऊ ठोसरे यांच्यासह गोपाल मानतकर, श्यामभाऊ राऊत, विकी भैय्या जगताप, विजुभाऊ जैवळ, बंडूभाऊ खरात, तुषार चव्हाण, अविनाश मुदमाळी, शंकर दसरे, आदित्य तिवारी, कामे, आणि गजानन कायंदे आदी पदाधिकारी व औषध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments