गुंजखेड/लोणार(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): तालुक्यातील गुंजखेड येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या (CHO) कामकाजाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकारी कर्तव्यावर सतत गैरहजर राहत असल्याचा आरोप करत, त्यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी संघपाल नागवंशी पनाड व ग्रामस्थांनी आज दि. १३ मे रोजी तालुका आरोग्य अधिकारी (T.H.O.) लोणार यांना 'तक्रार निवेदन' सादर केले आहे.
आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
शासनाच्या 'आयुष्यमान भारत' योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, गुंजखेड येथे कार्यरत असलेले अधिकारी सातत्याने गैरहजर राहत असल्याने केंद्र सरकारच्या या मूळ धोरणालाच हरताळ फासला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे स्थानिक नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, ज्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
"आम्हाला सेवेसाठी तत्पर असणारा अधिकारी द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल," असा इशारा गुंजखेड येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार लोणार आणि गटविकास अधिकारी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर संघपाल नागवंशी पनाड, विजय उत्तम पाईक यांच्यासह अनिल वाठोरे, समाधान सुलताने, रामा पनाड, किरण पनाड, सोनू पनाड, दामोधर सुरुशे, शुद्धोधन सरदार, राजहंस जावळे, करण जावळे, गौतम महादू जावळे, महेंद्र मधुकर पनाड व अन्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून, आता आरोग्य विभाग यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments