साखरखेर्डा (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
एका किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलत एका कामगाराची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव उंडा शिवारात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या हत्येला 'हृदयविकाराच्या झटक्याचा' (Heart Attack) रंग देऊन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासांत या बनावाचा पर्दाफाश केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत करमजीतसिंग ऊर्फ मंजीतसिंग जनकसिंग (वय ५०-५५, रा. पंजाब) हे गेल्या अनेक वर्षांपासून हार्वेस्टर मशीनवर फोरमेन म्हणून कार्यरत होते. सध्या ते गहू आणि मका कापणीसाठी आपल्या सहकाऱ्यांसह पिंपळगाव उंडा येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मदतनीस बबलीलिंग करणसिंग (वय ३४, रा. मानसा, पंजाब) हादेखील कामावर होता.
वाद विकोपाला गेला आणि घात झाला!
दिनांक २९ एप्रिलच्या रात्री जमिनीची मोजणी आणि धान्य गळतीच्या मुद्द्यावरून करमजीतसिंग आणि बबलीलिंग यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. संतापाच्या भरात आरोपी बबलीलिंगने करमजीतसिंग यांच्या डोक्यावर मागील बाजूने लोखंडी सळईने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत करमजीतसिंगांना तिथेच सोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
असा फसला हत्येचा बनाव
सकाळी जेव्हा गावकरी व्यायामासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांना करमजीतसिंग मृतावस्थेत आढळले. हा खून नसून हृदयविकाराचा झटका असल्याचे भासवण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला. मात्र, सखरेखर्डा पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता, मृताच्या डोक्यावर खोल जखम आढळून आली. करमजीतसिंग यांनी डोक्यावर पगडी बांधलेली असल्याने रक्तस्त्राव चटकन लक्षात आला नव्हता, ज्यामुळे हा बनाव रचणे सोपे झाले होते.
पोलिसांची तत्परता: ७ तासांत आरोपी जेरबंद
सखरेखर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयावरून पंजाबमधील सात कामगारांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान मुख्य आरोपी बबलीलिंग फरार असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला ताब्यात घेतले असता, त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे.
मृत्यूशी झुंज अपयशी:
तपासात असेही समोर आले की, जखमी अवस्थेत असताना करमजीतसिंग यांनी आपल्या मालकाला फोन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, समोरून प्रतिसाद न मिळाल्याने आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सध्या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


0 Comments