जालन्यात नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश;देउळगाव राजा कनेक्शन आले समोर.


जालना(गावकरी टाईम्स/प्रतिनिधी):
नशेच्या गोळ्यांची अवैध तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा जालन्यातील कदीम जालना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदाराला अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंगीकारक औषधी साठा जप्त करण्यात आला आहे.

 

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कदीम जालना पोलिसांनी २८ एप्रिल २०२६ रोजी नशेच्या गोळ्यांची तस्करी करण्याचे एक प्रकरण उघडकीस आणले होते. याप्रकरणी नूतन वसाहत भागातील सय्यद सलमान सय्यद गफार याला सुरुवातीला अटक करण्यात आली होती. त्याची कसून चौकशी केली असता, या संपूर्ण काळ्या बाजाराची पाळेमुळे पोलिसांच्या हाती लागली.

मुख्य सूत्रधाराला ठोकल्या बेड्या

सय्यद सलमानने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार करण सुरेंद्रसिंग ठाकूर (वय ३०, रा. गणपती गल्ली, जालना) आणि त्याला मदत करणारा गिरीश लत्ताड (वय ६१, रा. दे. राजा, जि. बुलढाणा) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर गुंगीकारक आणि प्रतिबंधित औषधी साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत माहिती

या महत्त्वपूर्ण कारवाईची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजवीरसिंह संधू यांच्या उपस्थितीत कदीम जालना पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. शहरात आणि जिल्ह्यात नशेच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईला वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे अवैध औषध विक्रेत्यांचे आणि तस्करांचे धाबे दणाणले असून, कदीम जालना पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments