सिंदखेडराजा (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून एक धक्कादायक आर्थिक फसवणुकीचे प्रकरण समोर आले असून, केवळ ११ वी पर्यंत शिक्षण झालेल्या एका व्यक्तीने दोन मोठ्या बँकांना तब्बल ३१ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या महाठगाचे नाव रायचंद सखाराम कुरंगळ असल्याचे समजते. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्याच्या बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक आणि पूर्णवादी बँकेला आपले लक्ष केले होते. त्याने वेअरहाऊसच्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्यावर बँकांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले. विशेष म्हणजे, एका बँकेचे कर्ज फेडण्यासाठी त्याने दुसऱ्या बँकेकडून पुन्हा कर्ज घेतले आणि या चक्रात बँकांना अडकवत नेले.
रॅकेटमध्ये मोठे मासे असण्याची शक्यता
पोलिस तपासात समोर आले आहे की, आरोपीने १७७ बनावट खातेदारांच्या माध्यमातून एका बँकेत २३.३३ कोटी, तर दुसऱ्या बँकेत ८.१२ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. हा आकडा ५० कोटी रुपयांच्याही पुढे जाण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये काही बँक कर्मचारी, एजंट आणि काही शेतकऱ्यांचाही समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू
आरोपी रायचंद कुरंगळ हा सतत आपल्या गाड्या बदलून पोलिसांना गुंगारा देत असल्याचेही तपासात समोर आले आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला असून, आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या मोठ्या "स्कॅम" मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

0 Comments