टिटवी-लोणार रस्त्यावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार



लोणार (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): लोणार तालुक्यातील टिटवी-लोणार रस्त्यावर बुधवारी रात्री एका अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात २८ वर्षीय तरुण जागीच ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे लोणार परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. ​

नेमकी घटना काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन केशव भगत (वय २८, रा. लोणार) आणि विठ्ठल विश्वनाथ कावळे (वय ४८, रा. धायफळ) हे दोघे कामानिमित्त टिटवी येथे गेले होते. बुधवारी (दि. २९ एप्रिल) रात्री ९ वाजेच्या सुमारास काम आटोपून ते आपल्या दुचाकीने (क्र. MH-28 AT 368) लोणारकडे परतत होते. टिटवी गावाजवळील चढ-उताराच्या रस्त्यावर समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.

जागीच मृत्यू आणि फरार चालक

धडक इतकी जोरात होती की सचिन भगत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी व नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच सचिन यांची प्राणज्योत मालवली होती. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांचा संताप

लोणार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. दरम्यान, या अपघातामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोणार-टिटवी मार्गावर सध्या गॅस पाईपलाईनचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेला मातीचे ढीग साचले आहेत. त्यातच रात्रीचा अंधार आणि जड वाहनांची वर्दळ यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला असून, अशा कामांमुळेच वारंवार अपघात होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

लोणार पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी वाहनाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. एका तरुण मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments